मराठवाडा विभागात यंदा अतिवृष्टीने खूप साऱ्या पिकांचे नुकसान केले होते. त्यातून कापाशीचे पीकही सुटू शकले नाही. कापसाच्या पिकाला यंदा चांगलाच फटका बसला त्यामुळे उत्पन्नात देखील मोठी घाट झाल्याचे दिसून आले. आणि याच परिणामस्वरूप बाजारात कापसाला मागणी वाढल्याचे दिसून येत आहे.
कापसाला पांढरं सोनं म्हणून ओळखल जात. मिरजगावच्या बाजारात कापसाला वाढीव भाव मिळू लागल्याने बाजारपेठेत कापसाला चांगलीच झळाळी असल्याचे दिसत आहे. यावर्षी शेतकऱ्यांच्या कापसाला खुल्या बाजारात हमीभावापेक्षा जास्त दर मिळत असल्याकारणाने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
मध्यम धागा व लांब धागा असलेल्या कापसाला यावेळी वेगवेगळा भाव मिळत आहे. यंदा कापसाला चांगला भाव मिळत असल्याने मागील वर्षीच्या तुलनेत खरेदी केंद्रावर चांगल्या प्रतीच्या मालाची आवक दिवसेंदिवस वाढतच असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
यंदा शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणून ओळखले जाणाऱ्या कापसाला तब्बल 9,200 ते 9,500 पये भाव मिळत आहे. यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. श्रीगोंदा, आष्टी, करमाळा, कर्जत, जामखेड या भागामधून कापूस उत्पादक शेतकरी मिरजगाव येथील कापूस खरेदी केंद्रावर कापूस विक्रीकरिता घेऊन येत आहेत.
सध्या कापसाला 6,380 इतका शासकीय हमीभाव तर खासगी कापूस खरेदी केंद्रांवर कापसाला 8000 ते 9,200 रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. शासनाचा हमीभाव आणि खुल्या बाजारातील दरात मोठी तफावत असल्याने या भागातील शासकीय हमीभाव केंद्र अजून चालूच झाले नाही. शेतकरी आपला माल खासगी कापूस खरेदी केंद्रांवर घेऊन जाण्यास प्राधान्य देत आहेत.
खुल्या बाजारात कापसाला मिळत असलेला बाजार भाव पाहता कापूस खरेदी केंद्रावर दररोज हजारो क्विंटल कापसाची खरेदी होत आहे. शासकीय हमीभाव केंद्राकडे कापूस उत्पादकांनी पाठ फिरवली असल्याकारणानेच असे होत असल्याचे म्हटले जात आहे.
यंदा कर्जत तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रभरात परतीच्या पावसाने चांगलेच थैमान घातल्याने कपशीवर पिकावर मोठ्या प्रमाणावर रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. तसेच हवामान बदलामुळे उत्पादन देखील घटले आहे. मोसमाच्या सुरवातीला बाजारात पावसाने भिजलेला कापूस विक्रीला आल्याने भाव कमी होते.
आता मात्र चांगल्या प्रतीचा कापूस बाजारात येत असल्याने भावदेखील चांगला मिळत आहे. यंदा कापूस उत्पादनात घट झाल्याचे दिसून येत आहे त्यामुळे कापसाच्या भावात आणखी तेजी येण्याची शक्यता व्यापारी वर्गातून व्यक्त केली जात आहे.