भाजीपाला व फळ पिकाला प्लास्टिक मल्चिंग करण्यासाठी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत हेक्टरी खर्चाच्या पन्नास टक्के म्हणजेच १६ हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येत आहे.

या योजनेअंतर्गत आतापर्यंत 32 लाभार्थ्यांना 5 लाख 22 हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले असून, एकूण 182 अर्ज रद्द झाले आहेत. शेतकऱ्यांनी या योजनेसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे.

महाडीबीटी पोर्टलवर भाजीपाला व फळपिकांसाठी प्लॅस्टिक मल्चिंग या बाबीसाठी आतापर्यंत 442 अर्ज प्राप्त झालेले होते. त्यापैकी 320 अर्जाची लॉटरीद्वारे निवड झाली आहे. निवड झालेल्या लाभाथ्यांपैकी 182 लाभार्थ्यांनी प्रत्यक्ष कामे केलेली नाहीत वा करण्याची इच्छा दर्शविली नाही. त्यामुळे लाभार्थ्यांचे अर्ज रद्द झाले आहेत. उर्वरीत 170 अजापैकी 32 लाभधारकांना त्यांनी कामे पुर्ण केल्यामुळे 5 लाख 22 हजार रुपये अनुदान अदा करण्यात आलेले आहे.

निवड झालेल्या लाभार्थ्यांपैकी 138 लाभार्थ्यांचे अर्ज प्रक्रियेमध्ये असून त्यांची कामे पुर्ण केल्यानंतर अनुदान अदा करण्यात येणार आहे. अर्ज केलेल्या एकूण 442 लाभार्थ्यांपैकी 122 लाभार्थ्यांची लॉटरीमध्ये अद्याप निवड झालेली नसून नजिकच्या काळामध्ये सदर लाभार्थ्यांची निवड अपेक्षित आहे. जिल्ह्याला प्लॅस्टिक मल्चिंगसाठी मिळालेला लक्षांक पाहता अर्ज केलेल्या प्रत्येक लाभार्थ्यास योजनेचा लाभ देणे शक्य आहे.

अधिक माहितीसाठी लातूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील फलोत्पादन तंत्र सहाय्यक विकास बालकुंदे यांच्याशी किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने केले आहे.

अशी ठरवा प्लास्टिक मल्चिंग पेपरची जाडी..

तीन ते चार महिन्याच्या (भाजीपाला पिकासाठी प्लॅस्टिक मल्चिंग पेपरची जाडी किमान 25 मायक्रॉन असावी. तसेच बारा महिन्याच्या (उदा. पपई) या फळपिकासाठी मल्चिंग पेपरची जाडी किमान 50 मायक्रॉन असावी. तसेच बारा महिन्यांवरील (जास्त कालावधीचे फळ पिके) फळपिकासाठी मल्चिंग पेपरची जाडी किमान 100 किंवा 200 मायक्रॉनपेक्षा कमी असू नये.

काय लागतील कागदपत्रे, कुठे कराल अर्ज ?

ऑनलाईनसाठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम https://mahadbtmahait.gov.in या ऑनलाईन व्हेबसाईटवर रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे.

त्यानंतर अर्ज करण्यासाठी
जमिनीची कागदपत्रे :- 7/12 व 8A
आधार कार्डची झेरॅाक्स,
आधार कार्ड हे बॅंकेशी संलग्न असल्याच्या पासबुकची झेरॅाक्स इ. कागदपत्रे आवश्यक असतील.
अर्ज भरताना सर्व्हे नंबर / गट नंबर माहिती असायला हवा.

हा अर्ज तुम्ही जवळच्या CSC सेंटरवरही करू शकता..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *