गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहे. ऐन हिवाळ्यात अवकाळी पाऊस सुरू आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तर गारपीट देखील झाली होती. गेल्या महिन्यात अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्र्यामुळे अवकाळी पाऊस पडला होता.
दरम्यान, चालू महिन्यात बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा पुढे चक्रीवादळात परावर्तीत झाला असल्याने याचे साईड इफेक्ट आता महाराष्ट्रावर देखील पाहायला मिळत आहेत, असे भारतीय हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या या हंगामातील तिसऱ्या मिसँग या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे मळभ गडद होत आहेत. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या नवीन चक्रीवादळामुळे देशातील विविध राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस बरसत आहे. तसेच याचे साईड इफेक्ट आपल्या राज्यात देखील पाहायला मिळत आहेत .
राज्यातही अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. राज्यातील मराठवाडा, विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानासह तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. परिणामी राज्यातील शेतकरी रडकुंडीला आले आहेत. यामुळे त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.
दरम्यान, अवकाळी पावसाने उघडीप द्यावी आणि पुन्हा एकदा कडाक्याची थंडी पडावी अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. अशातच आता भारतीय हवामान खात्याने राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
मंगळवारी बुधवारी मराठवाडा आणि विदर्भ विभागात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. नांदेड सोलापूर, धाराशिव , अहमदनगर, लातूर या भागात अवकाळी पाऊस पडेल असे आयएमडीने सांगितले आहे. यामुळे या भागातील शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्य नागरिकांनी शेती पिकांची आणि पशुधनाची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान तज्ञ पंजाबराव डंख यांचा अंदाज काय ?
चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर मोठा परिणाम होणार नसला तरी विदर्भात आणि मराठवाड्यातील पश्चिम विदर्भातील अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, चांदूरबाजार, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे. तर पूर्व विदर्भातील चंद्रपूर, वर्धा, नागपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये अवकाळीसह गारपिटीची शक्यता व्यक्त केली आहे.
याशिवाय मराठवाड्यातील लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, छत्रपती संभाजी नगर, जालना या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. परंतु, मराठवाड्यात सर्व दूर पाऊस पडणार नाही. तसेच पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात प्रामुख्याने ढगाळ हवामान राहील त्या ठिकाणी पाऊस पडणार नाही असा अंदाज पंजाबराव डख यांनी दिला आहे.