Take a fresh look at your lifestyle.

Maharashtra: 10 एक्सप्रेस – वे, 3,000 Km अंतर, 3 लाख कोटींचा खर्च, येत्या 5 वर्षात प्रत्येक जिल्ह्याला जोडण्याची मेगा योजना, पहा डिटेल्स..

0

भारतातील विकासात अग्रेसर असणारं राज्य म्हणजे महाराष्ट्र. त्यांचदृष्टीने वाटचाल करत राज्यातील सरकार राज्यातील सर्व 36 जिल्ह्यांना जोडण्याच्या उद्देशाने सुमारे 3,000 किमी चे महामार्ग तयार करण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेवर काम करत आहे.

भारतातील सर्वात लांब महामार्ग म्हणून ओळखला जाणारा 701 किमीचा ‘समृद्धी महामार्ग’ म्हणजेच नागपूर – मुंबई एक्सप्रेस – वे 520 किमी अंतराचा पहिला टप्पा नागपूर ते शिर्डी सुरु करण्यात आला असून येत्या वर्षभरात 210 किमी अंतराचा शिर्डी ते मुंबई खुला होणार आहे. याशिवाय राज्यात सुमारे 10 इतर महामार्ग प्रकल्प विविध टप्प्यांवर विकासमार्गावर आहेत.

MSRDC चे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी पुढील 5 वर्षांत संपूर्ण महामार्ग नेटवर्कचे काम पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त केली असून त्यांना एकूण 3 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. राज्यातील जवळपास प्रत्येक जिल्ह्याला रस्त्याच्या जाळ्याने जोडण्याचे आमचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं.

येत्या 5 वर्षांत एक वेगळाच महाराष्ट्र तुम्हाला पाहायला मिळणार आहे. नेटवर्क पूर्ण झाल्यानंतर, विकासाच्या अपार शक्यता वाढतील. नवीन उद्योग, विविध हब, स्मार्ट सिटी आदींचा मार्ग खुला होईल. मोपलवार हे मुख्यमंत्री कार्यालयातील पायाभूत सुविधा प्रकल्पांवरील वॉर रूमचे महासंचालक आहेत.

समृद्धी नंतरचा नागपूर – गोव्याला जोडणारा शक्तीपीठ एक्सप्रेस -वे :-

MSRDC च्या या सर्व प्रकल्पांपैकी सर्वात लांब आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प हा नागपूर – गोवा महामार्ग प्रकल्प असणार आहे, ज्याला ‘शक्तीपीठ द्रुतगती मार्ग’ म्हणून लोकप्रिय करण्याची योजना सरकारद्वारा आखण्यात आली आहे. सुमारे 760 किमी लांबीचा शक्तीपीठ द्रुतगती मार्ग, भारतातील सर्वात लांब द्रुतगती मार्गांपैकी एक मानल्या जाणाऱ्या नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गापेक्षा जास्त लांबीचा असणार आहे.

MSRDC ने ऑक्टोबरमध्ये व्यवहार्यता अभ्यास करण्यासाठी आणि प्रकल्पाचा तपशीलवार प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्यासाठी सल्लागार निवडण्यासाठी निविदा मागवल्या होत्या. एमएसआरडीसीकडून मिळालेल्या माहितीनुसार, डिसेंबर अखेर महामंडळाच्या अधिकाऱ्यांना सल्लागार मिळणे अपेक्षित आहे.

शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग तब्बल 11 जिल्ह्यांमधून जाणार असून, यामुळे विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातील भाग एकमेकांना जोडले जाणार आहेत. या महामार्गामुळे महाराष्ट्र – गोवा सीमेवर असलेल्या वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, बीड, उस्मानाबाद, सोलापूर, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग हे जिल्हे जोडले जाणार आहे.

हा महामार्ग महाराष्ट्रातील सेवाग्राम, कारंजा लाड, माहूर, औंढा नागनाथ, नांदेडमधील तखत सचकंद गुरुद्वारा, परळी-वैजनाथ, अंबाजोगाई, तुळजापूर, पंढरपूर आणि कुणकेश्वर यासारख्या अनेक धार्मिक आणि आध्यात्मिक केंद्रांना जोडण्याचे काम करणार आहे. हा एक्स्प्रेस वे तांत्रिकदृष्ट्या वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून सुरू होणार असून महाराष्ट्र – गोवा राज्य सीमेवरील पत्रादेवी (पर्नेम तालुका) येथे संपणार आहे.

75 हजार कोटींचं बजेट असलेला हा 6 लेन प्रवेश – नियंत्रित महामार्ग असणार आहे. या एक्स्प्रेसवेमुळे नागपूर आणि गोवा दरम्यानचा प्रवासाचा वेळ सध्याच्या 21 तासांच्या प्रवासाहून सुमारे 7 तासांपर्यंत कमी होणार आहे.

MSRDC च्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “नागपूर-मुंबई द्रुतगती महामार्ग नागपूर ते वर्ध्यातील पवनारपर्यंत कनेक्टिव्हिटी प्रदान करेल, त्यानंतर कोकणात जाण्याची इच्छा असलेले प्रवासी शक्तीपीठ महामार्गाद्वारे कोकणात जाऊ शकतात.”

नागपूर – मुंबई समृद्धी ग्रीनफिल्ड महामार्ग नागपूर, वर्धा, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, नाशिक, अहमदनगर आणि ठाणे या जिल्ह्यांना जोडण्याचे काम करत आहे.

शक्तीपीठ द्रुतगती मार्ग विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश त्या भागांना व्यापणार आहे, जे भाग नागपूर – मुंबई महामार्गाने जोडले गेलेले नाहीत..

पहा, राज्यात येत्या 5 वर्षांत हे महामार्ग होणार..

नागपूर – गोवा द्रुतगती मार्गाव्यतिरिक्त, MSRDC विदर्भातील कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी नागपूर – मुंबई द्रुतगती मार्ग, नागपूर-गोंदिया, गोंदिया -गडचिरोली आणि जालना – नांदेड आणि जालना – नाशिक यांना जोडणारे गडचिरोली – नागपूर महामार्ग यासारख्या प्रकल्पांवर काम करत आहे.

MSRDC अधिकार्‍यांनी सांगितले की, जालना – नांदेड आणि जालना – नाशिक महामार्गांवरील बांधकाम सुरू होण्याच्या अवस्थेत असलेल्या इतर प्रकल्पांसाठी ऑक्टोबर 2023 पर्यंत निविदापूर्व सर्व कामे पूर्ण करण्याचे कॉर्पोरेशनचे उद्दिष्ट आहे. MSRDC ने त्यावेळी महत्त्वाकांक्षी मुंबई – गोवा कोकण द्रुतगती मार्ग प्रकल्पासाठी निविदापूर्व उपक्रम पूर्ण करणार आहे.

कोकण एक्स्प्रेस वे मुंबई ते सिंधुदुर्गला जोडला जाणार असून नागपूर-गोवा महामार्ग पत्रादेवी येथे मिळणार आहे असे MSRDC च्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

मुंबईतील विरार आणि अलिबाग या सॅटेलाइट शहरांमधील मल्टी-मॉडल कॉरिडॉर आणि पुण्याच्या सभोवतालच्या रिंग रोडवरही कॉर्पोरेशन काम करत आहे, ज्यासाठी DPR तयार आहे. सध्याच्या मुंबई – पुणे एक्स्प्रेस वेची क्षमता वाढवण्याच्या प्रक्रियेत आहे आणि पुणे-नाशिक इंडस्ट्रियल कॉरिडॉरच्या व्यवहार्यता अभ्यासासाठी निविदाही मागवण्यात आल्या आहेत.

मोपलवार यांनी सांगितलं की, या प्रत्येक प्रकल्पासाठी सर्वोत्तम आर्थिक अंमलबजावणी मॉडेल सुचवण्यासाठी आमच्याकडे लवकरच व्यवहार सल्लागार असणार आहे.

सुरत-चेन्नई द्रुतगती मार्ग, औरंगाबाद – पुणे आणि पुणे – बेंगळुरू महामार्गासह महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये कनेक्टिव्हिटी वाढवणाऱ्या इतर काही महामार्ग प्रकल्पांवरही केंद्र काम करत असल्याचे ते म्हणाले..

Leave A Reply

Your email address will not be published.