म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून 22 मे रोजी सुरू झालेल्या 4 हजार 82 घरांच्या सोडत अर्ज नोंदणी व स्वीकृती प्रक्रियेला उत्तम प्रतिसाद मिळत असून, 1 लाख अर्ज नोंदणीचा टप्पा लवकरच पार होण्याची शक्यता आहे शुक्रवार सायंकाळपर्यंत म्हाडाच्या अद्ययावत प्रणालीमध्ये 97 हजार 765 अर्जदारांनी नोंदणी केली असून, त्यापैकी 69 हजार 187 अर्जदारांनी अनामत रकमेसह अर्ज दाखल केले आहेत.

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून अंधेरी, जुहू, गोरेगाव, कांदिवली, बोरिवली, विक्रोळी, घाटकोपर, पवई ताडदेव, सायन येथील 4 हजार 82 सदनिकांच्या विक्रीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ 22 मे रोजी करण्यात आला होता.

IHLMS 2.0 ( इंटिग्रेटेड हाऊसिंग लॉटरी मॅनेजमेंट सिस्टिम ) एकात्मिक गृहनिर्माण सोडत व्यवस्थापन प्रणाली ही म्हाडाच्या संगणकीय सोडत प्रणालीचे 2.0 व्हर्जन आहे. तसेच ॲण्ड्रॉईड मोबाइल

फोनवर प्ले स्टोर आणि ॲपल मोबाइल फोनवर ॲप स्टोरमध्ये सोडत प्रणालीचे मोबाइल ॲप्लिकेशन म्हाडा हाऊसिंग लॉटरी सिस्टिममध्ये इच्छुक अर्जदारांकरता उपलब्ध करून देण्यात आले आहे.

म्हाडाने यापूर्वी पुणे, औरंगाबाद, कोकण मंडळासाठी एकात्मिक संगणकीय सोडत प्रणालीचा वापर केला असून, मुंबईच्या सोडतीसाठी सध्या ई – नोंदणी सुरू आहे. मुंबई मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या सुधारित वेळापत्रकानुसार, 10 जुलै 2023 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करू शकणार आहेत, तर रात्री 11.59 वाजेपर्यंत अनामत रकमेचा ऑनलाइन भरणा 12 जुलै 2023 रोजी बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत आरटीजीएस / एनईएफटीद्वारे अर्जदारांना करता येणार आहे.

17 जुलै 2023 रोजी दुपारी 3 वाजता सोडतीसाठी प्राप्त अर्जाची प्रारूप यादी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. 19 जुलै 2023 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यापासून ऑनलाइन दावे – हरकती दाखल करता येणार आहेत.

24 जुलै 2023 रोजी दुपारी 3 वाजता सोडतीसाठी स्वीकृत अर्जांची अंतिम यादी म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. सदनिकांच्या वितरणाकरता प्राप्त अर्जाची संगणकीय सोडत वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा नाट्यगृहात काढण्यात येणार असून, सोडतीची दिनांक व वेळ नंतर जाहीर करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *