बहुप्रतीक्षित मान्सून अखेर गुरुवारी देवभूमीत दाखल झाला. एका आठवड्याच्या विलंबाने भारताच्या मुख्य भूमीवर आगमन झालेल्या वरुणराजाने संपूर्ण केरळ व्यापला असून, राज्यात सर्वत्र पाऊस जोरदार बरसत आहे. कोणत्याही अडथळ्याविना मान्सूनची अशीच वाटचाल सुरू राहिली तर आठवडाभरात तो गोवा, कोकण किनारपट्टीमार्गे महाराष्ट्रात 15 जूनपर्यंत दाखल होऊ शकतो, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
कृषिप्रधान भारतीय अर्थव्यवस्थेसाठी संजीवनी असलेल्या मान्सूनचे आगमन बळीराजासह सर्वांसाठी आनंदवार्ता आहे. मान्सुनचे 1 जून रोजी केरळमध्ये आगमन होत असते. मात्र यंदा तो चार दिवस उशिराने दाखल होणार होता. त्यात ‘बिपरजॉय’ चक्रीवादळामुळे त्याची वाटचाल अजूनच रेंगाळली.
अखेर बिपरजॉय पाकिस्तानच्या दिशेने रवाना झाले आणि मान्सूनचा मार्ग मोकळा झाला. मान्सूनचे 8 जून रोजी केरळात आगमन झाल्याच गुरुवारी हवामान खात्याने जाहीर केले .
मान्सूनपूर्व अंदाजात केरळात सुरुवातीला कमी पावसाचे आकीत वर्तवण्यात आले होते. मात्र वरुणराजाने हा अंदाज खोटा ठरवत जोरदार हजेरी लावली आहे. पुढील 48 तासांत संपूर्ण केरळसह तामिळनाडू, कर्नाटक, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग व्यापेल, असे हवामान विभागाने नमूद केले आहे.
पुढील दोन दिवसांत मान्सून कर्नाटकात प्रवेश करण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने बुधवारी पुढील 48 तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होईल, अशी माहिती दिली होती. मात्र बदललेल्या वातावरणातील स्थितीमुळे मान्सून गुरुवारी दाखल झाला.
केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रात पोहोचण्यासाठी साधारणपणे 8 ते 10 दिवसांचा वेळ लागतो. त्या अंदाजानुसार गुरुवारी मान्सून केरळमध्ये आल्याने महाराष्ट्रात मान्सून 16 ते 18 जून रोजी दाखल होण्याचा अंदाज आहे.
16 मे रोजी हवामान विभागाने जाहीर केलेल्या अंदाजानुसार, मान्सून 4 जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होणार होता व त्यात चार दिवसांची तफावत होईल, असेही नमूद करण्यात आले होते. मात्र, त्याला विलंब झाला असून, प्रत्यक्षात गुरुवारी केरळमध्ये मान्सूनने गमन केले. केरळात मुसळधार पाऊस कोसळत असून 9 जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट, तर एका जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मान्सून उशिरा आला असला तरी जोरदार बरसत असल्यामुळे विलंबामुळे निर्माण झालेली तूट पुढील दोन – तीन दिवसांत भरून निघेल, असे सांगण्यात येत आहे. दक्षिण अरबी समुद्राच्या दक्षिणेकडून आलेला मान्सून आता मध्य अरबी समुद्र, दक्षिण तामिळनाडू, मन्नारची खाडी, बंगालची खाड़ी या मार्गाने वाटचाल करत आहे.
उशिरा आला असला तरी त्याचा सरासरी पर्जन्यमानावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता नसल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. ‘अल निनो’ चा प्रतिकूल प्रभाव राहण्याची शक्यता असली तर देशात यंदा मान्सूनचा पाऊस सामान्य राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. देशात जून ते सप्टेंबर या प्रमुख चार महिन्यांत दीर्घकालीन सरासरीच्या (एलपीए) 96 टक्के पाऊस पडेल, असा अंदाज आहे.
कृषिप्रधान भारतासाठी मान्सूनचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. देशातील 52 टक्के कृषी क्षेत्र मान्सूनच्या पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे बळीराजा पावसाची चातकाप्रमाण वाट बघत असत . मान्सूनच्या आगमनासोबत पेरण्यांना वेग येतो.
राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता..
मान्सूनपूर्व पावसाला अनुकूल वातावरण तयार झाल्याने राज्यात पुढील चार दिवस मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पाऊस, तसेच सोसाट्याचा वारा वाहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्याच्या काही भागात गेले काही दिवस मान्सूनपूर्व पाऊस पडत आहे. कमी दाबाचा पट्टा कार्यरत असल्यामुळे मान्सूनपूर्व पावसाला अनुकूल वातावरण आहे. कडाक्याच्या उन्हाबरोबर ढगाळ हवामान राज्याच्या अनेक भागात आहे.
मध्य महाराष्ट्र व कोकणात कमाल तापमान घटलेले आहे. मराठवाडघात तापमान सरासरीच्या जवळपास आहे. विदर्भात उष्णतेचा पारा 40 अंश सेल्सिअसच्या वर आहे. राज्यात गुरुवारी सर्वात जास्त तापमान वर्धा येथे 44 अंश सेल्सिअस होते. तर सर्वात कमी तापमान महाबळेश्वर येथे 18.5 अंश सेल्सिअस नोंद करण्यात आले.
येत्या 9 ते 12 जूनदरम्यान कोकणातील काही भागांत मेघगर्जना, विजाच्या कडकडाटांसह पाऊस, तसेच किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वळणार आहे. त्याचप्रमाणे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि पावसासह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.