हवामान बदल, तापमानवाढ, अल – निनोचा प्रभाव यामुळे महाराष्ट्रात सरासरीच्या 95 टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे, असा अंदाज ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी शुक्रवारी वर्तवला.
तसेच जून आणि जुलै महिन्यात पावसाचा खंड पडण्याची शक्यता असून ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पावसाचे प्रमाण साधारण राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कमी कालावधी आणि कमी पाणी लागेल, अशीच पिके घेणे योग्य ठरेल, असा सल्लाही डॉ. साबळे यांनी दिला आहे. तसेच महाराष्ट्रात मान्सून 10 जूनपर्यंत दाखल होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
2023 या वर्षासाठी जून ते सप्टेंबरमधील मान्सून पावसाच्या अंदाजाबाबत आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. साबळे यांनी ही माहिती दिली. कमाल तापमान, सकाळ आणि दुपारची सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी या निकषांवर आधारित राज्याचा पावसाचा अंदाज आहे.
त्यानुसार राज्यात सरासरीच्या 95 टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे. याबाबत डॉ. साबळे म्हणाले, यंदा पावसाळ्याच्या कालावधीत सरासरीपेक्षा कमी पाऊस होईल. वाऱ्याचा वेग, सूर्यप्रकाशाचा कालावधी व तापमान कमी आढळल्याने जून, जुलै महिन्यात धुळे, जळगाव, राहुरी, कराड, अकोला, पाडेगाव, शिंदेवाही (चंद्रपूर) येथे पावसात मोठे खंड पडतील.
दापोली, पुणे, कोल्हापूर, नागपूर, यवतमाळ, निफाड, सोलापूर व परभणीमध्ये खंडाचा कालावधी कमी राहण्याची शक्यता आहे. कमी दिवसांत अधिक पाऊस आणि काही काळ पावसात मोठे खंड असे हवामान राहणार असल्याचे साबळे यांनी सांगितले.
सरासरीच्या तुलनेत यंदा कमी पाऊस होणार असल्याने नागरिकांनी पाण्याच्या काटकसरीवर भर देणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी कमी पाण्यात आणि कमी कालावधीत येतील, अशी पिके घ्यावीत. 65 मिलीमीटर पावसाचा जमिनीत ओलावा निर्माण झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करण्याची जाखीम पत्करू नये, असेही डॉ. साबळे यांनी सांगितले.
राज्यातील विभागनिहाय पावसाचा सरासरी अंदाज..
पश्चिम महाराष्ट्र : 93.5 टक्के
उत्तर महाराष्ट्र : 95 टक्के
कोकण : 94 टक्के
मराठवाडा : 93 टक्के
पूर्व विदर्भ : 100 टक्के
मध्य विदर्भ : 100 टक्के
पश्चिम विदर्भ : 93 टक्के