Monsoon in India : मान्सूनचा मुहूर्त हुकला, आता या तारखेपर्यंत वाट पहा, पण आजही ‘या’ जिल्ह्यांत वादळासह वळवाचा पाऊस..
देशातील शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या असतानाच केरळात मान्सूनचे आगमन काही दिवस लांबणीवर गेले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार रविवारी मान्सून केरळमध्ये धडकण्याचा अंदाज होता. मात्र, ही तारीख चुकली आहे, तरीही मान्सूनसाठी परिस्थिती अनुकूल आहे. त्यामुळे तीन ते चार दिवस उशिरा मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. अशा स्थितीत महाराष्ट्रातही मान्सून 10 जूननंतरच धडकण्याची शक्यता आहे.
वातावरणाच्या स्थितीविषयक आणखी विस्तृत माहितीच्या आधारे हवामान विभाग मान्सून आगमनाबाबत सोमवारी अधिक माहिती जाहीर करणार आहे. मान्सून लांबला तरीही खरीप पेरणी आणि देशभरातील एकूण पर्जन्यमानावर परिणाम होणार नसल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
नैऋत्य मान्सून सर्वसाधारणपणे 1 जून रोजी केरळात धडकणार होता. त्यानंतर सात दिवसांनी देशभरात मान्सून सक्रिय होणे अपेक्षित होते. पण, यंदा 4 जून रोजी मान्सूनचे केरळमध्ये आगमन होईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने मे महिन्यात वर्तवला. मात्र, तसे झाले नाही.
दक्षिण अरबी समुद्रावरील पश्चिमेकडील वारे वाढल्यामुळे मान्सूनसाठी परिस्थिती अनुकूल होत आहे. तसेच पश्चिमेकडील वाऱ्याचा खाली हळूहळू वाढत आहे. 4 जून राजा या बान्याचा खोली वाढली असून व ती सरासरी समुद्री सपाटीपासून 2.1 किमीपर्यंत पोहोचली आहे, असे हवामान खात्याने एक निवेदन जारी करत स्पष्ट केले.
आग्नेय अरबी समुद्रावरील ढगांचे प्रमाणही वाढत आहे. ही अनुकूल परिस्थिती केरळमध्ये मान्सूनसाठी पुरेशी असून, पुढील तीन – चार दिवसांत त्यात आणखी सुधारणा होईल, अशी आशा हवामान खात्याने व्यक्त केली. मान्सून आगमनासंबंधित परिस्थितीवर बारकाईने लक्ष आहे. याबाबत सोमवारी अधिक माहिती दिली जाईल, असे हवामान विभागाने म्हटले आहे.
भारतात अल – निनोची परिस्थिती असूनही नैऋत्य मोसमी हंगामात सामान्य पाऊस पडण्याची अपेक्षा आहे. तसेच वायव्य भारतात यंदा सामान्य ते सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची अपेक्षा हवामान खात्याने व्यक्त केली.
दरम्यान, गतवर्षी मान्सून दक्षिणेकडील राज्यांत 29 मे रोजी आला होता. तत्पूर्वी 2021 मध्ये 3 जून, 2020 मध्ये 1 जून, 2019 मध्ये 8 जून आणि 2018 मध्ये 29 मे राजा मान्सून दाखल झाला होता.
उल्लेखनीय बाब अशी की, भारतात 52 टक्के निव्वळ लागवड क्षेत्र मंसुनवर अवलंबून आहे. त्यामुळे कृषी क्षेत्रासाठी सामान्य पाऊस महत्त्वाचा आहे. तसेच देशभरातील वीजनिर्मिती व्यतिरिक्त पिण्याच्या पाण्याकरिता जलाशये भरण्यासाठी पाऊस महत्त्वाचा आहे. देशाच्या एकूण अन्नधान्य उत्पादनात पावसावर आधारित शेतीचा वाटा सुमारे 40 टक्के आहे. त्यामुळे भारताच्या अन्न सुरक्षा आर्थिक स्थैर्यासाठी मान्सून महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
राज्यात ठिकठिकाणी वळवाचा पाऊस..
राज्यात रविवारी मध्य महाराष्ट्र , कोकण , विदर्भातील काही भागांत वळवाचा पाऊस पडला आहे. दरम्यान, पुढील चार दिवस राज्यात ठिकठिकाणी पावसाची शक्यता तसेच विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
राज्यात मान्सूनचे आगमन 10 जूनच्या सुमारास होत आहे. त्याअगोदर वळवाच्या पावसाला अनुकूल असलेला कमी दाबाचा पट्टा राज्यात कार्यरत झाला आहे. त्यामुळे गेले काही दिवस राज्यात विविध भागांत पाऊस पडत आहे. रविवारी मध्य महाराष्ट्रातील पुण्यात 13.3 मिमी, जळगाव 4 मिमी, महाबळेश्वर 15 मिमी, नाशिक 2 मिमी तर सांगलीत 20 मिमी इतका पाऊस पडला आहे.
कोकण भागातील डहाणूमध्ये 8 मिमी तर विदर्भातील अकोलामध्ये 0.3 मिमी, अमरावती 14 आणि वयात 3 मिमी पाऊस पडला आहे. राज्यात सर्वात जास्त तापमान ब्रह्मपुरीत 42.5 तर सर्वात कमी तापमान महाबळेश्वरमध्ये 18.8 अंश सेल्सिअस इतके नोंदवले आहे.
आजही या जिल्ह्यांत कोसळणार वळवाचा पाऊस..
आज राज्यातील मध्य महाराष्ट्र, कोकण पट्टा व मराठवाड्यात पावसाची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणातील प्रामुख्याने दक्षिण कोकणात आज पूर्व मौसमी पाऊस पडणार आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दक्षिण कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यात तसेच मध्य महाराष्ट्रमधील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि मराठवाडा विभागातील धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यात पूर्व मोसमी पाऊस पडणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे.