मान्सूनला अनुकूल स्थिती झाल्यामुळे पुढील 24 ते 48 तासांत केरळमध्ये दाखल होईल, असा दावा पुण्यातील हवामान विभागाचे अतिरिक्त महासंचालक डॉ. के. एस. होसाळीकर यांनी केला आहे. दरम्यान, बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम राज्याच्या वातावरणावर होणार नाही. तसेच, राज्यात पुढील चार दिवस काही भागात विजांच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
दक्षिण अरबी समुद्रावर पश्चिमेकडील वाऱ्याचा प्रभाव, तसेच तेथील वाऱ्याच्या उंचीत वाढ झाली आहे. वाऱ्याचा वेग खालच्या थरात जास्त होता, तो आता वरच्या थरातही जास्त आहे. तसेच, अरबी समुद्र, लक्षद्वीप, केरळ किनारपट्टीवर ढगाळ वातावरण तयार झाल्याने आगामी 48 तासांत केरळमध्ये मान्सून दाखल होईल.
दरम्यान, बिपर जॉय चक्रीवादळाची दिशा महत्त्वाची आहे. हे वादळ मुंबईपासून सुमारे 1000 किमी अंतरावर समुद्रात निर्माण होणार आहे. सध्याच्या परिस्थितीनुसार ते पश्चिमेकडे झुकण्याची शक्यता आहे. मात्र, चक्रीवादळ कोकण किनारपट्टीकडे सरकल्यास संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर जोरदार पाऊस होईल. त्याचा फायदा झाल्याने मोसमी वाऱ्यांचा वेग वाढण्याचा अंदाज आहे.
त्यामुळे चक्रीवादळाच्या दिशेवरहवामान खाते लक्ष ठेवून आहे. राज्यात बुधवारी (दि.7) विदर्भातील काही भागात मान्सूनपूर्व पाऊस पडला आहे. दरम्यान, पुढील चार दिवस मध्य महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता तसेच कोकणात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस व सोसाट्याचा वारा वाहणार हवामान खात्याने वर्तविली आहे. राज्यात सर्वात जास्त तापमान चंद्रपूरमध्ये 43.8 तर सर्वात कमी तापमान महाबळेश्वरमध्ये 18 अंश सेल्सिअस इतके नोंदविले आहे.
राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता ; हवामान विभागाच्या शास्त्रज्ञ ज्योती सोनार यांचा अंदाज..
राज्यात कोकण – गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागातील तुरळक ठिकाणी येत्या 24 तासांत पावसाची शक्यता आहे. तर अरबी समुद्रात कमी दाबाचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने बिपरजॉय चक्रीवादळ तयार होत आहे. मात्र, त्याचा राज्यातील हवामानावर परिणाम होणार नाही. त्यामुळे राज्यातील हवामानात देखील फारसा बदल होणार नसल्याचे अंदाज पुणे हवामान विभागाच्या शास्त्रज्ञ ज्योती सोनार यांनी वर्तवला आहे .
हवामान विभागाने कोकण आणि गोवा किनारपट्टीच्या काही भागात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे . तसेच , गोवा किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्रात काही भागात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे .
तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे . मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. विदर्भ परिसरात तुरळक ठिकाणी हवामान कोरडे राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
चक्रीवादळाचे आज अतितिव्रतेत रूपांतर होणार वादळ आज ओमानच्या दिशेला वळणार..
अरबी समुद्रात तयार झालेल्या ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचे रूपांतर तीव्रतेत झाले आहे. आज गुरुवारी ( दि. 8) या वादळाची तीव्रता आणखी वाढणार आहे. या वादळाचा परिणाम म्हणून कोकण, मुंबई आणि पुण्याच्या काही भागात ढगाळ वातावरण असणार आहे.
तसेच, किनारपट्टीवर जोराचे वारे वाहणार असल्याने नागरिकांना हवामान विभागाकडून सावधतेचा इशारा देण्यात आला आहे. हे चक्रीवादळ मुंबईपासून 990 किमी अंतरावर आहे. मात्र, आज हे चक्रीवादळ ओमानच्या दिशेने सरकणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. या चक्रीवादळामुळे मुंबईसह कोकणात पुढील पाच ते सहा दिवस किनारपट्टी भागात 40 ते 60 किमी वेगाने वारे वाहणार आहेत.
त्यामुळे समुद्र किनारी राहणाऱ्या नागरिकांसह मच्छिमारांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, हे चक्रीवादळ महाराष्ट्रात किनारपट्टीला धडकणार नसले तरी, समुद्रात आग्नेय दिशेला चक्रीय स्थिती आहे. त्याचा फटका कोकण, मुंबई, पालघर आणि गुजरात किनारपट्टी भागाला बसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.