Mumbai – Bangalore Highway : नवले पुलावर होणार उड्डाण पूल, पुण्यातील सर्व्हिस रोडच्या भूसंपादनासाठी दरवर्षी 100 कोटींची तरतूद !
नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान खडकवासला मतदारसंघाचे आमदार भिमराव तापकीर यांची लक्षवेधी सूचना चर्चेसाठी घेण्यात आली होती. या लक्षवेधी सूचनेत तापकीर यांनी पुणे रस्त्यांसंदर्भात वस्तुस्थिती सभागृहात मांडली. या लक्षवेधी सूचनेवर बोलताना शंभूराज देसाई यांनी सभागृहाला पुण्यातील रस्ते व त्याच्या कामकाजाविषयी माहिती देण्याचे काम केलं.
पुण्यातील कात्रज बोगदा ते दरी पुलापर्यंत जाण्यासाठी पुणे बायपास रस्त्याचा वापर होतो. ज्या ठिकाणी सर्व्हिस रोड नसतील व डीपीच्या रस्त्यांना ज्या काही अडचणी असतील त्या रस्त्यांच्या भूसंपादनासाठी दरवर्षी 100 कोटी रुपयांची तरतूद आवश्यक असून या बाबतीत महानगरपालिकेच्या संबंधिताना सूचना करणार असल्याचे व तातडीची कार्यवाही करण्यास सांगणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे.
सर्व्हिस रोड ताब्यात घेऊन भूसंपादनासाठीच्या निधीची तरतूद बजेटमध्ये प्राधान्याने करायला सांगण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी जागा ताब्यात घेतली आहे तिथे प्रथम प्राधान्याने सर्व्हिस रोड बनवण्याचे आदेश महानगरपालिकेला देणार आहे. तसेच, स्पीड गनसाठी आवश्यक असणारी वाहने पुण्याच्या पालकमंत्र्यांना विनंती करून उपलब्ध करून देण्यात येतील, असे देखील शंभूराज देसाई यांनी सभागृहात सांगितले.
तसेच वडगाव उड्डाण पूल व मुठा नदीवरील पूल हा चार पदरी आहे तर महामार्ग सहा पदरी असल्याने त्याबाबत माहिती घेऊन महामार्ग प्राधिकरणाकडे तसा प्रस्ताव देखील पाठविण्यात येणार आहे. तसेच, मुंबई बंगलुरू महामार्गावरील नवले पूल ते स्वामी नारायण मंदिरादरम्यान वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर तीव्र उतार कमी करण्यासाठी उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे.
यामुळे नवले पुलालगतचे अपघात टाळण्यासाठी मोठी मदत होणार आहे. अशी माहिती विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात प्रश्नांना उत्तर देताना सार्वजनिक बांधकाम मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
यासंदर्भात आमदार तापकीर यांनी प्रस्ताव पाठवल्यानंतर केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची भेट घ्यावी. तशी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व्यक्तिगत विनती करतीलच. हा उड्डाणपूल झाल्यास अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होणार असून वाहतूक कोंडी देखील सुटणार आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला तशी विनंती केली जाणार असून राज्य स्तरावर स्वतः पाठपुरावा करून उड्डाणपूल करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही मंत्री देसाई यांनी सभागृहात सांगितले.