महाराष्ट्र राज्याच्या महामार्गांचा चेहरा मोहरा बदलणारा आणि विकासात सोनेरी भर टाकणारा हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा आता विस्तार केला जाणार आहे. खुद्द महाराष्ट्र राज्याचे वन व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नानंतर या मार्गाला चंद्रपूर ते राजुरापर्यंत विस्तारित करण्यासाठी हिरवा कंदील मिळाला आहे.

या महामार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल लवकरच तयार करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने भूसंपादन करण्यासाठी सुमारे 20 कोटी रुपये निधी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला लवकरच उपलब्ध करून दिले जाणार आहे. अशी माहिती सुधीर मुनगुंटीवार यांनी दिली आहे.

हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे नुकतेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. नागपूर ते शिर्डीपर्यंतची पहिल्या टप्प्यातील वाहतूक आता सुरू झाली आहे. चंद्रपूर हा महाराष्ट्रातला औद्योगिक जिल्हा म्हणून ओळखला जातो. या भागात मोठ्या प्रमाणात जडवाहतूक होते. महाराष्ट्र समृद्धी महामार्गासारख्या मार्गाची कनेक्टीव्हीटी मिळाल्यास ही वाहतूक आणखी सोपी होणार आहे.

महाराष्ट्र समृद्धी महामार्ग तसेच शिर्डी आणि मुंबईला जाणाऱ्यांना सोयीचे पडावे यासाठी चंद्रपूर ते राजुरापर्यंत समृद्धी महामार्गाचा विस्तार करण्यात यावा, अशी मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाकडे गेल्या जुलै महिन्यात केली होती. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार येताच महाराष्ट्र समृद्धी महामार्गांच्या कामाला गती मिळाली आहे, असे मुनगुंटीवारांनी सांगितले आहे.

खरेतर हा मार्ग सामान्य लोकांसाठी सुरू करण्यात आला असून आता पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे समृद्धी महामार्ग बांदा ते चांदापर्यंत करण्याचे स्वप्नही पूर्ण होणार आहे. मुनगंटीवार हे स्वतः अर्थमंत्री असतानापसून चांदा ते बांदापर्यंत लोककल्याणाच्या अनेक योजना राबविल्या. अनेक चांगल्या योजना त्यांनी चंद्रपुरात आणल्या. शिवाय अनेक प्रकल्प देखील त्यांनी सुरू केले.

महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हासुद्धा चंद्रपुरातून जावा, ही त्यांची मागणी आता फळाला आली आहे असे म्हणावे लागेल. मुनगंटीवार यांच्या पत्राची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या सहाय्यक प्रशासकीय संचालकांनी सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाच्या अप्पर मुख्य सचिवांना पत्र पाठवून सविस्तर प्रकल्प अहवाल आणि भूसंपादनासाठी 20 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे.

प्रस्तावित नागपूर (दाताळा एक्सचेंजपासून) ते चंद्रपूरपर्यंतचे अंतर 135 किलोमीटर आहे व राजुरापर्यंत 165 किलोमीटर आहे. चंद्रपूर जिल्हा आदिवासीबहुल व जंगलाने व्याप्त आहे. ताडोबासारखा राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्प याठिकाणी आहे. विविध खनिजानी समृद्ध असलेल्या या जिल्ह्याची अर्थव्यवस्था वीज निर्मिती, खनिज उद्योग, सिमेंट, पेपरमिल, कोळसा, फेरो अलॉय प्लांट आदी उद्योगांभोवती केंद्रीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *