मुंबई – गोवादरम्यान धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनची रेल्वे प्रशासनाकडून 16 मे रोजी सीएसएमटी – मडगावदरम्यान चाचणी घेण्यात आली. यशस्वी चाचणी आणि महत्त्वाच्या तांत्रिक बाबी तपासणीनंतर अखेर परवा शनिवार, 3 जून रोजी मुंबई – गोवा वंदे भारत एक्स्प्रेस प्रत्यक्ष धावणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मडगाव येथून या गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार असल्याची माहिती कोकण रेल्वे प्रशासनाच्या विश्वसनीय सूत्रांकडून देण्यात आली आहे. अवघ्या सात तासात मुंबई ते गोवा एक्स्प्रेस धावणार असल्याने प्रवाशांचा दोन तासांहून अधिक वेळ वाचणार आहे.

प्रवाशांना वेगवान सुरक्षित, सर्व सोयी – सुविधा, आरामदायी प्रवास द्यावा, या उद्देशाने भारतीय रेल्वे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या दिशेने वाटचाल करत आहे. वंदे भारत ट्रेनसारख्या सेमी हायस्पिड रेल्वे प्रत्यक्षात सुरू करून भारतीय रेल्वेने जगभरात वेगळा ठसा उमटवला आहे.

गोव्यातील पहिली वंदे भारत ट्रेन..

देशातील विविध 14 मार्गांवर हायटेक आणि अत्याधुनिक सेमी – हायस्पिड ट्रेन अर्थात वंदे भारत एक्स्प्रेस धावत असताना संपूर्ण देशात वेगाने जाळं निर्माण करत आहे. मे महिन्यातच पंतप्रधान मोदींनी ओडिशा आणि आसामला पहिली वंदे भारत ट्रेन भेट दिली होती. त्यानंतर आता महाराष्ट्रासाठी आणखी एका वंदे भारत ट्रेनची भर पडणार आहे. मुंबई ते गोवा दरम्यान धावणारी ही वंदे भारत एक्सप्रेस गोव्याची पहिली वंदे भारत ट्रेन असणार आहे. मुंबईसाठी चौथी वंदे भारत ट्रेन असली तरी याआधी वंदे भारत एक्स्प्रेस मुंबईहून गांधीनगर, सोलापूर आणि शिर्डीला धावते.

रत्नागिरी जिल्ह्यात दोन थांबे, कसा आहे टाईमटेबल, पहा..

वंदे भारत ट्रेनने अवघ्या 7 तासांत मडगाव गाठल्याने मुंबईहून कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांमध्ये या ट्रेनविषयी कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. ही उत्सुकता अखेर संपणार असून, येत्या 3 जूनपासून मुंबई – गोवा वंदे भारत एक्स्प्रेस धावणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

या गाडीला रायगड जिल्ह्यात रोहा तर रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरी, खेड, कणकवली येथे थांबा देण्यात आल्याची माहिती कोकण रेल्वे प्रशासनाच्या विश्वसनीय सूत्रांकडून देण्यात आली आहे.

CSMT हुन सकाळी 5:50 वाजता सुटणार..

ही गाडी मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून सकाळी 5.35 वाजता सुटेल. ठाणे 6.05, पनवेल 6.40, खेड 8.40, रत्नागिरी 10.00, मडगाव दुपारी 1.25 अशा तिच्या वेळा असणार आहेत.

मडगाव येथून वंदे भारत दुपारी 2.35 वाजता सुटेल. परतीच्या प्रवासात रत्नागिरीतील तिची वेळ 5.35 आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनसला ही गाडी रात्री 10.35 वाजता पोहोचेल..

तिकटी दर..

मुंबई – मडगाव चेअर कारसाठी 1 हजार 745 रुपये आणि ईसीसाठी (एक्झिक्युटिव्ह चेअर कार) 3 हजार 290 रुपये तिकीट निश्चित करण्यात आले आहे. यात IRCTC खाद्यपदार्थ शुल्काचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *