दादर पंढरपूर त्री साप्ताहिक एक्सप्रेस मिरजपर्यंत सोडावी अशी मागणी प्रवासी संघटनांकडून करण्यात येत होती. या मागणीला यश मिळाले. रेल्वे बोर्डाकडून ही गाडी दादर ते सातारा व्हाया पंढरपूर व मिरज अशी सोडण्यास मंजुरी मिळाली. खासदार संजय पाटील यांनी पाठपुरावा केल्याची माहिती संघटनेकडून दिली.
मध्य रेल्वे पुणे विभागीय सल्लागार समितीचे सदस्य किशोर बोरावत, म्हणाले, रेल्वे प्रवासी सेना व रेल्वे प्रवासी संस्थेच्या माध्यमातून याबाबत सातत्याने मागणी केली होती.
दादर पंढरपूर एक्सप्रेस ही दादर – सातारा एक्सप्रेस म्हणून धावेल. ही गाडी व्हाया पंढरपूर, मिरज अशी असेल. या गाडीचा आठवड्यातून तीन दिवस मिरज ते सातारा दरम्यान सोमवार , मंगळवार व शनिवारी जाण्या व येण्याकरिता तसेच मिरज ते कुर्डुवाडी, पंढरपूरपर्यंत प्रवास करण्यास उपयुक्त ठरेल.
कवठेमहाकाळ, ढालगाव, जत, सांगोला या प्रवाशांना पुणे व मुंबईला जाण्याकरिता थेट गाडीची सुविधा उपलब्ध होणार असल्याचे रेल्वे प्रवासी सेनेचे कार्याध्यक्ष संदीप शिंदे, उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, किशोर भोरावत यांनी सांगितले.
सांगली, सातारा, सोलापूर जिल्हयातील वारकऱ्यांची 75 वर्षांची मागणी होती. सांगली, सातारा जिल्ह्यातील विविध रेल्वे स्टेशनवरुन पंढरपूरला जाणारी रेल्वे सुरु व्हावी. यासाठी खासदार संजयकाका पाटील यांनी पुढाकार घेतला. भाजपचे मकरंद देशपांडे, मध्य रेल्वे मुंबई सल्लागार समितीचे सुकुमार पाटील, उमेश शहा यांनी पाठपुरावा केला.
गाडी क्रमांक 11027 व 11028 दादर (मुंबई) – पंढरपूर गाडीचा विस्तार मिरज स्टेशनमार्गे सातारापर्यंत केला आहे. ही गाडी दादर – मुंबईहून सुटून ठाणे, कल्याण, लोणावळा, चिंचवड, पुणे, उरुली, केडगाव, दौंड, भिगवण, जेऊर, केम, कुडूवाडीमार्गे पंढरपूरला येईल.
पंढरपूरहून पुढे सांगोला, मसोबा डोंगरगाव, जत रोड, ढालगाव, कवठेमहांकाळ, मिरज, सांगली, भिलवडी किर्लोस्करवाडी, ताकारी, कराड, मसूर, कोरेगाव मार्गे साताराला जाईल. साताऱ्याहून परत निघून ही गाडी याच मार्गे दादरला (मुंबई) पोहोचेल. ही गाडी लवकरच सुरु होईल. त्याबाबतचा रेल बोर्डचा अध्यादेश 25 जानेवारीला निघाला आहे.