महाराष्ट्र शासनाने राज्यात 5000 किलोमीटरचे एक्स्प्रेस – वे नेटवर्क विकसित करण्याची योजना आखली आहे. या योजनेद्वारे पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण आणि प्रादेशिक विकासाला चालना देण्यासाठी प्रमुख शहरांना जोडण्यासाठी समृद्धी महामार्गाचे विस्तृत नेटवर्क तयार करण्याचे महत्त्वाकांक्षी अभियान महाराष्ट्रात सुरु असून मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गाचा इगतपुरी (नाशिक) ते आमने गाव (ठाणे) पर्यंतचा शेवटचा टप्पा येत्या वर्षाअखेर पूर्ण होणार आहे.
आता या परिवर्तनीय योजनेचा एक महत्त्वाचा घटक, जालना – नांदेड समृद्धी महामार्ग महाराष्ट्रातील जालना आणि नांदेड शहरांमधील कनेक्टिव्हिटीमध्ये क्रांती घडवून आणणार आहे.
सुमारे 179.85 किलोमीटरचा हा अत्याधुनिक 6 – लेन एक्सप्रेसवे प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी, प्रादेशिक गतिशीलता वाढवण्यासाठी आणि आर्थिक वाढीला चालना देण्यासाठी डिझाइन केला असून आता या एक्स्प्रेस -वेच्या बांधकामाला सुरुवात होणार आहे.
या एक्सप्रेस-वेसाठी 10 स्थापत्य अभियांत्रिकी कंपन्यांनी 179.85 किमी लांबीच्या जालना – नांदेड द्रुतगती मार्ग प्रकल्पाच्या बांधकामासाठी एकूण 23 निविदा सादर केल्या आहेत. 120 किमी प्रतितास वेग मर्यादेसह एक्सप्रेसवेची रचना करण्यात आली आहे. हा 6 पॅकेजेस (JNE-1, JNE-2, JNE-3, JNE-4, JNE-5 आणि JNE-6) अंतर्गत विकसित केला जाणार असून नांदेड आणि मुंबई दरम्यानचा प्रवास वेळ 11 तासांवरून 6 तासांवर येणार आहे..
जालना – नांदेड समृद्धी महामार्गाच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाची निविदा प्रक्रिया सुरु झाल्याबद्दल या प्रकल्पाचे जनक माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी समाधान व्यक्त केले असून, पुढील 5-6 वर्षांच्या काळात नांदेड जिल्ह्यातील अनेक रस्ते व रेल्वेचे प्रकल्प अधिक गतीमान करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे म्हटले आहे.
जालना – नांदेड नवीन द्रुतगती महामार्गामुळे मराठवाड्याच्या पूर्वेला असलेल्या परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्याला समृद्धी महामार्गाशी थेट संपर्क मिळणार असून, या तीनही जिल्ह्यातून औरंगाबाद, पुणे व मुंबईला जाण्यासाठी लागणारा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
हा एक्सप्रेस – वे जालना येथून सुरू होऊन ईशान्येकडे परभणीपर्यंत जातो. परभणीहून एक्सप्रेस – वे पूर्वेला हिंगोली आणि नंतर दक्षिणेकडे नांदेडला जातो. हा एक्स्प्रेस – वे चार जिल्ह्यांतील एकूण 87 गावातून जाणार असून एक्सप्रेस – वे एमएसआरडीसी बांधणार आहे..
काय होणार फायदा..
या प्रकल्पाचा शेतकरी, व्यापारी, उद्योजक, बाहेरगावी असलेले विद्यार्थी, नोकरदार मंडळी, प्रवासी अशा सर्वच घटकांना मोठा लाभ होईल. नांदेड जिल्ह्याची कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी नांदेड-लातूर नवीन रेल्वे मार्ग, नांदेड-बिदर रेल्वे मार्ग, नांदेड – हैद्राबाद महामार्ग अशा अनेक प्रकल्पही पुढे पूर्ण होणार आहे.
हा एक्सप्रेस – वे 6 पॅकेज अंतर्गत बांधला जाणार..
JNE-1 36.09 किमी
JNE-2 30.46 किमी
JNE-3 32.44 किमी
JNE-4 28.85 किमी
JNE-5 32.19 किमी
JNE-6 19.82+4.48 किमी (पॅकेजमध्ये हिंगोली गेट ते छत्रपती चौक या रस्त्याचा समावेश आहे)