शिक्षण घेऊन नोकरी न करता पूर्वापार चालत आलेली पारंपरिक शेती व्यवसाय करणे म्हणजे एक आव्हानच असतं, यामध्ये तुम्हाला समाजातील विविध घटकांकडून अनेक गोष्टी ऐकाव्या लागतात. मात्र याउलट शिक्षणाचा उपयोग करत शेतीला आधुनिकतेची जोड देत शेती फायद्यात आणत कुटुंबाची प्रगती साधणारे दौंड तालुक्यातील केडगाव येथील युवा शेतकरी योगेश दगडू शेळके यांनी शेतीत विविध प्रयोग केले आहेत.
योगेश शेळके यांनी आपले ग्रॅज्युएशन बीएस्सी मध्ये पूर्ण केले आहे. त्यांनी पुण्यासारख्या शहरात जाऊन नोकरी करण्यापेक्षा पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देत शेती केल्यास फायदा होऊ शकतो, असा विचार करून या क्षेत्राकडे वळण्याचा निर्णय घेतला.
योगेश यांचे वैशिष्ट्य म्हणजे शेतीतील उत्पन्नाच्या दृष्टीने दुर्लक्षित मानलेले पीक म्हणजे कांदापात, या अश्या दुर्लक्षित पिकामधुन त्यांनी लाखो रुपयांचे उत्पन्न घेऊन सर्वांचे लक्ष वेधू घेतले आहे.
एकूण दोन एकर क्षेत्रावर ते दरवर्षी कांदापातीच्या उत्पादनातून एकरी चार ते साडेचार लाख रुपयांचे उत्पन्न घेतात. त्यांना एकूण 12 एकर शेती आहे. त्यामध्ये पाच ते सहा एकर ऊस आणि उरलेल्या क्षेत्रात टप्प्याटप्प्याने मेथी, कोथिंबीर आणि कांदापातीचे उत्पादन घेतले जाते. कांदापातीचे उत्पादन घेताना जानेवारी महिन्याच्या अखेरीस रोपवाटिका तयार केली जाते.
5 बाय 10 फुटांचे वाफे काढले जातात. त्यामध्ये बी टाकून खते, औषधे व पाण्याचे योग्य नियोजन करून 45 ते 50 दिवसांत लागवडीसाठी रोपे तयार केली जातात. तयार रोपे पुनर्लागवडीसाठी काढून साधारण अडीच फूट सरी वर लावली जातात. त्यानंतर पाण्याचे योग्य नियोजन, खते, औषध फवारणी योग्य वेळी केली जाते.
रोगप्रतिबंधक औषधांचे वेळेवर नियोजन केल्याने 45 दिवसांत विक्रीयोग्य कांदापात तयार होते. एकरी 40 ते 45 हजार गड्डी इतके उत्पादन निघते. सरासरी प्रति गड्डीस 10 ते 15 रुपये इतका भाव मिळतो.
एकंदरीत एकूण उत्पन्न 4,50,000 ते 5,00,000 लाखांच्या घरात मिळत असल्याचे शेळके यांनी सांगितले आहे. कांदापातीची विक्री ही मुंबईतील वाशी मार्केट आणि पुणे मार्केटमध्ये केली जाते. मुंबईमध्ये एप्रिल, मे आणि जून या महिन्यांत मोठ्या प्रमाणात कांदापातीला मागणी असते. शेळके यांनी आधुनिक पद्धतीने तुषार सिंचन पद्धतीने कांदापातीचे उत्पादन यापूर्वी घेतले आहे.
यामध्ये पेरणी यंत्राद्वारे वाफा पद्धतीने पेरले जाते. नंतर तुषार सिंचनाचा वापर केला जातो. खते मातीतच दिली जातात. काही खतांचा डोस फवारणीमार्फत दिले जातात. 15 ते 20 दिवसांनंतर वातावरणानुसार औषधांच्या फवारण्या केल्या जातात. अशाच पद्धतीची कांदापातीची शेती आगामी काळात करण्याचा शेळके यांचा मानस आहे .
या माध्यमातून शारीरिक कष्टाची तसेच पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होते. दरवर्षी कांदापातीचे दोन एकरामध्ये उत्पादन घेतले जाते कोथिंबिरीच्या उत्पादनासाठी तुषार सिंचनाचा वापर केला जात आहे. शेळके यांचे एकत्रित कुटुंब असल्याने, शेतीमध्ये सर्वांची मदत होते.