निधी अभावी रखडलेल्या नाशिक – पुणे दुहेरी मध्यम द्रुतगती रेल्वे मार्गात आता बदल करण्यात आला आहे. प्रस्तावित मार्गातील बोगद्यांमुळे प्रकल्प खर्चात मोठी वाढ होत असल्याने आता हा मार्ग शिर्डीमार्गे होणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. मात्र, यामुळे आतापर्यंत या प्रकल्पासाठी भूसंपादन केलेल्या जमिनींचे काय, तसेच या जमिनीचा जा मोबदला देण्यात आला, याबाबत काय करायचे ? यासंदर्भात कोणतेही निर्देश अद्याप शासनाकडून देण्यात आलेले नाही.
नाशिकमध्ये आतापर्यंत या प्रकल्पाकरिता 45 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली असून, त्यासाठी बाधित शेतकऱ्यांना रक्कमही वितरीत करण्यात आली आहे. ही रक्कम परत घेण्याची वेळ येण्याची शक्यता आहे.
नाशिक – पुणे ही राज्यातील महत्त्वाची शहरे अजूनही रेल्वे मार्गाने जोडली गेली नाही. त्यामुळे ही शहर रेल्वेने जोडण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता.
हा मार्ग तयार करण्याची जबाबदारी महारेलकडे देण्यात आली. त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होती. जिल्ह्यातील नाशिक व सिन्नर तालुक्यातील बावीस गावांमधील सुमारे 287 हेक्टर जमीन खरेदीकरिता आवश्यक असलेल्या 250 कोटींच्या निधीपैकी जिल्हा प्रशासनाने शंभर कोटींची मागणी नोंदवली आहे.
आतापर्यंत जिल्ह्यात 45 हेक्टर क्षेत्र संपादित करण्यात आले असून, त्याकरिता संबंधित जमीन मालकांना 59 कोटी रुपये देण्यात आलेले आहेत. मात्र, आता मार्गच बदलल्याने जमीन मालकांना देण्यात आलेला मोबदला परत मिळवण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे; परंतु यासदंर्भात शासनाकडून अद्याप कोणतेही निर्देश देण्यात आलेले नाहीत.
यामुळे बदलला मार्ग..
नाशिक – पुणे रेल्वे मार्ग 235 किलोमीटरचा आहे. तो शिर्डीमार्गे झाल्यास 33 किलोमीटरने अंतर वाढणार आहे. या मार्गावर 12 ते 16 कोचची रेल्वे धावणार आहे. ही रेल्वे सेमी हायस्पीड असेल. विद्यमान मार्गावर एकूण 20 स्टेशन आहे. 18 बोगदे आणि 19 उड्डाणपूल आहे; परंतु या मार्गावरील बोगद्यांमुळे प्रकल्पाचा खर्चात मोठी वाढ होत असल्याने नाशिक – शिर्डी – पुणे असा पर्याय तयार केला जात आहे.
पुणे – नाशिक रेल्वे प्रकल्प
सिन्नरच्या 8 गावांमध्ये वाढले क्षेत्र..
सिन्नर तालुक्यातील 17 गावे आणि नाशिकमधील 5 गावांचा समावेश आहे. यातील 8 गावांतील 12.5 एकर 76 आर हे क्षेत्र नव्याने वाढले आहे. तब्बल 271 खातेदार, जमीन मालकांचा यात समावेश आहे. त्याचे संपादन केले जाणार आहे. त्यात वडगाव पिंगळा- 14 गट (84 मालक), चिंचोली- 8 गट (43 मालक) , मोह – 4 गट (30 मालक), बारागाव पिंप्री गट 6 (12 मालक) मानोरी 7 गट (31 मालक), मुसळगाव 3 गट (14 मालक दातली 1 गट (7 मालक), कसबे सिन्नर -3 गट (47 मालक) गटाचा समावेश आहे.
नाशिक – पुणे रेल्वे मार्गासाठी आतापर्यंत 45 हेक्टर जमिनीचे भूसंपादनही करण्यात आले आहे, परंतु मार्गात बदल झाल्याबाबत महारेलकडून अद्याप कोणतेही पत्र प्राप्त झालेले नाही. तसा निर्णय घेतला असेल, तर भूसंपादन केलेल्या जमिनींबाबत, तसेच दिलेल्या मोबदल्याबाबत काय करायचे, याबाबतही महारेलने कोणतीही स्पष्टता अद्यापपर्यंत केलेली नाही. त्यांच्या निर्देशानंतरच पुढील कार्यवाही केली जाईल.
– जलज शर्मा, जिल्हाधिकारी