नाशिक – पुणे सेमी हायस्पीड रेल्वे : महारेलच्या पत्रामुळे पुन्हा एकदा रेल्वेमार्गाला ब्रेक ! पहा 3 जिल्ह्यांतून जाणारा कसा आहे रेल्वे प्रोजेक्ट..
बहुप्रतीक्षित पुणे – नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्गाच्या थंडावलेल्या कामाला केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने बुस्टर डोस दिला असताना आता हे काम पुन्हा एकदा ठप्प झाले आहे. महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने (महारेल) जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवलेल्या एका पत्रातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
‘महारेल’कडे निधी उपलब्ध नसल्याने भूसंपादनाचे काम तत्काळ थांबवावे, अशी सूचनाच या पत्रात करण्यात आली आहे. त्यामुळे नाशिक – पुणेकरांचे सेमी हायस्पीड रेल्वेमार्गाचे हे स्वप्न सत्यात कधी उतरणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
नाशिक – पुणे या 232 किलोमीटरच्या रेल्वे मार्गासाठी महारेलच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त निधीतून हा प्रकल्प साकारण्यात येत आहे. प्रकल्पाच्या घोषणेपासून ते आजतागायत शेतकऱ्यांचा विरोध, संयुक्त मोजणी, प्रकल्पासाठी तीनदा बदललेली रचना अशी अडथळ्यांची शर्यत पार केल्यानंतर मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये या रेल्वेमार्गाला केंद्रीय रेल्वे मंत्रालयाची मान्यता नसल्याचा मुद्दा समोर आला होता. त्यामुळे हा रेल्वमाग होणार किंवा नाही याबाबत अनिश्चितता निर्माण झाली होती.
फेब्रुवारीच्या सुरुवातीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या रेल्वेमागाबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना सादरीकरण केले. तसेच, त्यांच्या आक्षेपांचे निराकरण करण्याच प्रयत्न केला. या बैठकीनंतर रेल्वेमंत्री वैष्णव या प्रकल्पाला तत्त्वतः मान्यता दिली होती. यामुळे मधल्या काळात रखडलेला नाशिक – पुणे रेल्वेमार्ग मार्गी लागल्याबाबत समाधान व्यक्त होत होते.
दरम्यानच्या काळात राज्य सरकारकडून उपलब्ध करून दिलेल्या निधीमधून जमिनीचे मूल्यांकन करणे व भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होती. मात्र, मागील आठवड्यात नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयास महारेलने पत्र पाठवून सद्यःस्थितीत निधी उपलब्ध नसल्याने भूसंपादनाचे कामकाज थांबविण्यात यावे, अशा तोंडी सूचना महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर कॉर्पोरेशन लिमिटेडच्या मुंबईतील वरिष्ठ कार्यालयाकडून स्थानिक कार्यालयास प्राप्त झाल्या होत्या.
त्यानंतर महारेलचे नाशिक येथील प्रमुख सल्लागार अशोक गरुड यांनी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत पत्र दिले असून, भूसंपादनाचे कामकाज पुढील आदेश निर्गमित होईपर्यंत थांबविण्याची विनंती केली आहे.
नाशिक जिल्ह्यातून नाशिक आणि सिन्नर तालुक्यातील 22 गावांमधून हा रेल्वेमार्ग जाणार आहे. सिन्नरमधील 17 आणि नाशिक तालुक्यातील पाच गावांचा यात समावेश आहे. आतापर्यंत या प्रकल्पासाठी सिन्नर तालुक्यातील 45 हेक्टर क्षेत्र संपादित करण्यात आले आहे.
ब्रॉडगेजवर असणार सेमी हाय स्पीड ट्रेन :-
ते सेमी हायस्पीड ब्रॉडगेजवर असणार आहे. हा प्रकल्प ब्रॉडगेजवर चालवल्यास प्रादेशिक शेतकरी आणि उद्योगांना मोठा फायदा होईल. महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने (MRIDC) दिलेल्या प्रस्तावानुसार, पुणे – नाशिक मार्गावर सेमी – हाय स्पीड ट्रेन ताशी 200 किलोमीटर वेगाने धावणार आहे. या मार्गावर एकूण 24 स्थानके असतील. या स्थानकांपेक्षा 8 मोठी स्थानके असतील. उर्वरित 16 स्थानके छोटी राहतील. ही गाडी महाराष्ट्रातील पुणे, अहमदनगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यांतून जाणार आहे.