Navi Mumbai Metro: 12 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आज 3 वा. पासून नवी मुंबई मेट्रो सेवा सुरू, पहा रूट, स्टेशन्स, तिकीट दर अन् टाइम टेबल..
12 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर, नवी मुंबई मेट्रो अखेर शुक्रवार आज 17 नोव्हेंबर रोजी उद्घाटनाशिवाय सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात बेलापूर ते पेंढारपर्यंत मेट्रो धावणार आहे. त्यासाठी सिडकोकडून सर्व तयारी करण्यात आली आहे. लोकांच्या गरजा लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणतीही औपचारिकता न ठेवता ती सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती सिडकोच्या जनसंपर्क अधिकारी प्रिया रितांबे यांनी दिली.
मुख्यमंत्री शिंदे आणि सिडकोचे एमडी अनिल डिग्गीकर यांच्यात बैठक झाली, त्यात बेलापूर ते पेंढार या मार्गावर मेट्रो सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. याआधीही अनेकवेळा मेट्रोचे उद्घाटन पुढे ढकलण्यात आले आहे. वास्तविक, मेट्रोच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतीक्षा होती, परंतु अनेक प्रयत्न करूनही त्यांना वेळ मिळू शकला नाही. त्यामुळेच आता कोणतेही उद्घाटन न करता सुरू करण्यात येत आहे.
तब्बल 12 वर्षांनंतर नवी मुंबईकरांचे मेट्रोचे स्वप्न पूर्ण होणार आहे. पहिला टप्पा सिडकोपासून सुरू होत आहे. बेलापूर ते पेंढर या 11.10 किमी लांबीच्या मार्गावर 11 स्थानके बांधण्यात आली आहेत. याशिवाय तळोजा येथील पंचनंद येथे डेपो तयार करण्यात आला आहे. दर 15 मिनिटांनी मेट्रो सेवा उपलब्ध झाली आहे.
पहिल्या टप्प्यात बेलापूर ते पेंढारपर्यंत धावणार मेट्रो..
17 नोव्हेंबर रोजी बेलापूर ते पेंढार दरम्यान पहिली मेट्रो दुपारी 3 वाजता सुरू होईल, तर 18 नोव्हेंबरपासून पहिली मेट्रो सकाळी 6 वाजता सुटेल. शेवटची मेट्रो रात्री 10 वाजेपर्यंत उपलब्ध असणार आहे. सिडकोला या प्रकल्पासाठी 3,063.63 कोटी रुपये खर्च अपेक्षित होता, मात्र आतापर्यंत 2,954 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.
11 किलोमीटरचा रूट..
सिडकोचे एमडी अनिल डिग्गीकर म्हणाले की, बेलापूर ते पेंढारपर्यंत मेट्रो सेवा सुरू होत आहे. मेट्रोच्या रूपाने नवी मुंबईकरांना जलद, पर्यावरणपूरक आणि आरामदायी वाहतुकीचा पर्याय उपलब्ध होणार आहे. वेगाने विकसित होत असलेल्या खारघर, तळोजा नोड्ससह सीबीडी बेलापूरला मेट्रोद्वारे चांगली कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. या प्रकल्पांतर्गत 4 उन्नत मार्ग विकसित केले जात आहेत. पहिल्या टप्प्यात बेलापूर ते पेंढार असा 11.10 किलोमीटर लांबीचा मार्ग सुरू करण्यात असून येथे 11 स्थानके असतील..
स्टेशन्सवर विशेष व्यवस्था..
अत्याधुनिक वातानुकूलित डब्यांमध्ये मेट्रो स्टेशन्सच्या दोन्ही बाजूंनी प्रवेश आणि बाहेर पडण्याची व्यवस्था आहे. मेट्रो स्थानकांवर पार्किंग, दिव्यांग प्रवाशांसाठी रॅम्प, फूटपाथ, ऑटो रिक्षा पार्किंग, डिझेल जनरेटर, कॉन्कोर्स आणि सीसीटीव्ही आदींची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय स्टेशनवर अनेक स्टॉल्सही उपलब्ध करण्यात आले आहे.
दर 15 मिनिटांनी उपलब्ध असणार सेवा..
17 नोव्हेंबर रोजी पेंढार ते बेलापूर आणि बेलापूर ते पेंढार दरम्यान पहिली सेवा दुपारी 3.00 वाजता आणि शेवटची सेवा रात्री 10.00 वाजता सुरू होईल. 18 नोव्हेंबरपासून ही सेवा नियमित होणार असून पहिली मेट्रो सकाळी 6.00 वाजता आणि शेवटची फेरी रात्री 10.00 वाजता धावेल. या मार्गावर दर 15 मिनिटांनी मेट्रो धावणार आहे..
महा मेट्रोने निश्चित केले भाडे..
– 2 किमीपर्यंत : 10 रु.
– 2 ते 4 किमीपर्यंत : 15 रु.
– प्रत्येक 2 किलोमीटरवर 5 रुपयांनी वाढ करण्याचा प्रस्ताव..
– 10 कि.मी च्या पुढे : 40 रु.
पहिल्या टप्प्यातील स्टेशन्स..
बेलापूर, सेक्टर – 7 बेलापूर, सायन्स पार्क, उत्सव चौक, सेक्टर – 11 खारघर, सेक्टर -14 खारघर, सेंट्रल पार्क, पेठापाडा, सेक्टर – 34 खारघर, पंचनाद आणि पेंढार टर्मिनल..