शेतीशिवार टीम, 27 डिसेंबर 2021 : सोमवारी महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा नवा व्हेरियंट असलेल्या ओमिक्रॉनच्या Omicron संख्येत मोठी वाढ झाली आहे. सोमवारी म्हणजे आज राज्यात ओमिक्रॉनचे 26 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 11 मुंबईतील, तर पाच रायगडमधील, चार ठाण्यातील, पुणे आणि नांदेडमधील प्रत्येकी दोन आहेत.
याशिवाय पालघर आणि भिवंडी-निजामपूरमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. यासह राज्यात या नव्या व्हेरियंटच्या विळख्यात आलेल्यांची एकूण संख्या 167 वर पोहचली आहे. राज्य आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
राज्य मंत्रिमंडळाने सोमवारी राज्यातील Covid-19 च्या वाढत्या संख्येवर चिंता व्यक्त केली आणि लसीकरणाचा वेग वाढवण्याची आणि कोरोना व्हायरसमुळे नवीन संकट येण्याची भीती असताना त्याचा प्रसार रोखण्यासाठी प्रभावी पावले उचलण्याच्या गरजेवर भर दिला.
मंत्रिमंडळ बैठकीत सांगण्यात आलं की, गेल्या 20 दिवसांत अँक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत सुमारे 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 26 डिसेंबर रोजी राज्यात Covid-19 चे 9813 रुग्ण उपचार घेत होते.
दक्षिण मुंबईतील विधानभवनात झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीत डिजिटल माध्यमातून भाग घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठकार यांनी कोरोना विषाणूच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी एक-दोन दिवसांत Covid-19 टास्क फोर्सची बैठक बोलावली आहे.
मुख्यमंत्री कार्यालयाच्या निवेदनानुसार, ठाकरे यांनी सतर्क राहून व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी प्रभावी पावले उचलण्याची सूचना केली.
निवेदनानुसार, मंत्रिमंडळाने गेल्या काही दिवसांत Covid-19 च्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याबद्दल चिंता व्यक्त केली. आरोग्य सचिव प्रदीप व्यास म्हणाले की, लसीकरणाचा वेग वाढवणे ही काळाची गरज असून काही दिवसांपूर्वी राज्यात एका दिवसात लसीचे आठ लाख डोस दिले जात होते, मात्र आता ते पाच लाखांवर आले आहे.