बाजार समितीच्या कांदा खरेदी केंद्रात आज शनिवारी (दि.1 जुलै) कांद्याचे भाव 2 हजार 600 रुपयांपर्यंत पोहचले आहे. दरम्यान, खरेदी केंद्रात कांदा खरेदी दरात सुधारणा होत असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. चांगल्या प्रतवारीचा कांद्याला 1600 ते 2600 रुपयांपर्यंतचा बाजारभाव मिळावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांची होती.
आज चांगलाच भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले असून पुन्हा दरवाढीची आशा आहे. तालुक्यात मागील हंगामात ऐन कांदा काढणी दरम्यान पावसाचे आगमन झाल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. यातच पावसाच्या तडाख्यामुळे कांदा पिकाचे अतोनात नुकसान झाल्यामुळे बाजारपेठेत चांगल्या प्रतवारीचा कांदाच नव्हता.
यामुळे फेब्रुवारी, मार्च महिन्यात कांदा बाजारभाव कोसळले होते. दरम्यान, मे, जून महिन्यापासून कांदा खरेदीच्या बाजारभावात सुधारणा होताना दिसून येत आहे. 500 विक्रीचे 1 हजार रुपये प्रतिक्विंटल दराची उसळी घेतलेला कांदा आता 2 हजार 600 पर्यंत पोहचला आहे.
वैजापूर बाजार समितीच्या घायगाव येथील कांदा मार्केटमध्ये शुक्रवारी सकाळी पार पडलेल्या मोकळा कांदा लिलावात साडेचार हजार क्विटलची आवक आली असून प्रतवारी नुसार व्यापाऱ्यांनी याठिकाणी 400 ते 1 हजार 920 रुपये दरापर्यंत प्रतिक्विटल या दराने खरेदी केली. कांदा खरेदी केंद्रात उशिरा का होईना दरात सुधारणा होत असल्याने शेतकऱ्यांत समाधान व्यक्त केले जात आहे.
54 लाखांची उलाढाल दरम्यान, बाजार समितीच्या कांदा खरेदी केंद्रात शुक्रवारी सकाळी पार पडलेल्या लिलावात 4 हजार 500 क्विटलची आवक आली होती. 54 लाखांची याठिकाणी उलाढाल झाल्याचे केंद्रप्रमुख चंचल मते यांनी सांगितले.
तर आज सकाळी नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील लासलगाव बाजार समितीत कांद्याला 2 हजार 600 पर्यंत सर्वाधिक दर मिळाला असून कांदा उत्पादकांमध्ये आनंदच वातावरण असून मार्केटमध्ये कांदा विक्रीसाठी झुंबड उडाली आहे. त्यापाठोपाठ खेड – चाकण बाजार समितीत 1800 प्रतिक्विंटल दर मिळाला आहे.
आठवडाभर होते कांदा खरेदी बाजार समितीच्या घायगाव येथील कांदा खरेदी केंद्रात कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आठवड्यातील सात दिवस मोकळा व गोणी लिलावाद्वारे दररोज सकाळी व सायंकाळी अशा दोन टप्प्यात कांदा खरेदी केला जातो. शेतकऱ्यांना कांदा विक्रीनंतर रोख पेमेंट देण्याच्या सूचना व्यापाऱ्यांना दिल्याची माहिती समितीचे सभापती रामहरी जाधव यांनी दिली.
दरम्यान, भाव नसल्याने अक्षरशः काही शेतकऱ्यांनी कवडीमोल दराने कांदा विकला होता. यातील उरलेल्या अनेक शेतकऱ्यांनी कांदा साठवून ठेवला होता मात्र मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसाने कांद्याचे पुरते वांदे झाले होते. यातून कांदा सडला आणि पुन्हा दर घसरले होते. यात शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. आता मात्र भाववाढ होत असल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.
पहा आजचे कांदा बाजारभाव..