केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर 40 टक्के शुल्क आकारल्याने आणि त्यानंतर विविध मागण्यांसाठी व्यापाऱ्यांनी दोन आठवड्यांपूर्वी संप पुकारल्याने गत काही दिवसांपासून कांद्याच्या दारांत वाढ होताना दिसून येत आहे. व्यापाऱ्यांनी संप मागे घेतल्यानंतर आता लिलाव पूर्ववत झाले आहेत.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला बुधवारी तब्बल 5,000 रुपये प्रति क्विंटल एवढा विक्रमी भाव मिळाला आहे. काल सोलापूर बाजार समितीमध्ये 1 हजार 35 गोणी कांद्याची आवक झाली होती. या लिलावात चांगल्या प्रतीच्या मालाला 5 हजार रुपये क्विंटल एवढा दर मिळाला आहे.
तर पिंपळगाव येथील बाजार समितीत बुधवारी उन्हाळ कांद्याला हंगामातील सर्वोच्च 3 हजार 950 रुपये दर मिळाला. आवक घटल्याने दरवाढ झाल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. बाजार समितीत दिवसभरात 13 हजार 500 क्विंटल कांद्याची आवक झाली.
मात्र, बहुतांश शेतकऱ्यांकडील उन्हाळ कांदा संपल्याने आणि यंदा पावसाने पाठ फिरवल्याने लाल कांद्याची लागवड कमी होऊन बाजारात आताच कांद्याची आवक घटली आहे. परिणामी हळूहळू दरवाढ होऊ लागली आहे. जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी उन्हाळ कांद्याची 13,500 क्विंटल आवक झाली असून, त्यास प्रतिक्विंटल जास्तीत जास्त 4 हजार, सरासरी 3400, तर कमीत कमी 1600 रुपये दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
दिवसभरात 545 वाहनांतून मालाची आवक झाली. गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोसह कांद्याचे घसरलेले दर पाहता उत्पादकांची निराशा झाली होती. मात्र, दुसरीकडे उन्हाळ कांद्याच्या घटलेल्या आवकेमुळे आता दरात सुधारणा होऊ लागली आहे. शेतकऱ्यांनी प्रतवारी करून माल विक्रीसाठी आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती आमदार दिलीप बनकर यांनी केले आहे.
जिल्ह्यात यंदा अत्यल्प पाऊस पडला आहे. त्यामुळे लाल कांद्याची लागवड कमी प्रमाणात झाली आहे. त्यातच बहुतांश शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेला उन्हाळ कांदा संपला आहे. त्यामुळे बाजारात कांद्याची आवक कमी झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.