Onion Rate : जागेवर विकताय कांदा, होऊ शकतो वांदा ! भारत दिघोळेंनी शेतकऱ्यांना दिली महत्वाची माहिती..
बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक कमी झाल्याने अनेक व्यापारी आता थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन माल खरेदी करत आहेत. त्यामुळे बाजार समिती मध्यस्थ नसल्याने शेतकऱ्यांची दर आणि रकमेविषयी फसवणूक होण्याची शक्यता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी उधारीत माल देऊ नये, तसेच त्या – त्या दिवशीच्या कांद्याच्या दराची माहिती घेतल्याशिवाय जागेवर व्यवहार करू नये असे आवाहन महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने केले आहे.
राज्यात नाशिक, अहमदनगर, पुणे, सोलापूर जिल्ह्यांत बाजार समित्यांची संख्या जास्त आहे. त्या तुलनेत महाराष्ट्रातील उर्वरित कांदा उत्पादक जिल्ह्यांमध्ये कांद्याच्या लिलावाची सुविधा असणाऱ्या बाजार समित्यांची संख्या कमी असल्याने धुळे, जळगाव, नंदुरबार, औरंगाबाद, बीड, नांदेड, जालना, बुलढाणा, उस्मानाबाद, सातारा, सांगली, कोल्हापूर, अकोला, परभणी, हिंगोली, अमरावती आदी जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना आपापला कांदा विक्री करण्यासाठी परजिल्ह्यातील बाजार, समित्यांवर अवलंबून राहावे लागते किंवा शिवार खरेदी म्हणजेच शेतातील खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना किंवा दलालांना कांदा विक्री करावा लागतो.
मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात कांद्याच्या दरात चढ – उतार होताना दिसत आहे. बाजार समित्यांची संख्या कमी असलेल्या वरील कांदा उत्पादक जिल्ह्यांमध्ये जागेवर शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून कांदा खरेदीसाठी शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात विचारपूस सुरू झालेली आहे; परंतु कोणीही कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी राज्यातील व देशातील त्या त्या दिवशीच्या कांद्याच्या बाजारभावाची माहिती घेतल्याशिवाय जागेवर कांदा खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांसोबत व्यवहार करू नये.
याबाबत महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या व्हॉट्सअँप ग्रुपमधून, तसेच फेसबुक ग्रुपमधून याबाबत जनजागृतीदेखील करण्यात आलेली आहे. असही दिघोळे यांनी सांगितले.
महाराष्ट्रासह देशातील बाजार समित्यांचे दैनदिन बाजारभाव येतात. या बाजारभावावर बारकाईने नजर ठेवून शेतकऱ्यांनी कांदा विक्रीचा व्यवहार करावा. कोणीही अनोळखी खरेदीदार व्यापारी किंवा दलालांना उधारीत कांदा विक्री करू नये.
एकट्यानेच कादा विक्री करण्याऐवजी पाच – पाच, दहा – दहा शेतकऱ्यांनी एकत्रितरित्या व्यवहार केल्यास त्या- त्या दिवसाचा योग्य तो कादा बाजारभावात व्यापाऱ्यासोबत किंवा दलालांसोबत व्यवहार करणे सोपे जाईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिली.
पहा कांदा बाजारभाव..