‘अटी आमच्या, ट्रॅक्टर रॅली तुमची’, शेतकरी-दिल्ली पोलीस यांच्यात असा निघाला तोडगा

0

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर जवळपास गेल्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आज 58 वा दिवस आहे. अद्यापही हवा तसा तोडगा निघालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रजासत्ताक दिनी दिल्लीत शिरुन ट्रॅक्टर रॅली काढण्याचा निर्धार केला आहे.

“आम्ही त्यांना सांगितलं, तुम्ही रॅली काढा. मात्र सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला आमच्या काही गोष्टी ऐकाव्या लागतील. तुम्ही दिल्लीच्या प्रवेशद्वारात प्रवेश करु शकता. मात्र, रॅलीत सहभागी झालेला एकही शेतकरी दिल्लीच्या रींग रोडवर जाणार नाही.

याशिवाय रॅलीत सहभागी झालेल्या कुणाच्याही जवळ काठी, हत्यार राहणार नाही. जर तसं आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. या कारवाईला कोणताच शेतकरी नेता विरोध करणार नाही”, असं एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं.

शेतकऱ्यांकडून प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅलीच्या प्रस्तावाला फेटाळून लावण्यासाठी दिल्ली पोलिसांनी साम-दाम-दंड-भेद सर्व प्रकार अवलंबली. मात्र, त्यातून काहीच निष्पन्न झालं नाही. शेतकरी आपल्या भूमिकेवरुन मागे हटत नाही हे लक्षात आल्यानंतर दिल्ली पोलिसांनी थोडी नरमाईची भूमिका घेतली. पोलिसांनी काही अटी-शर्ती ठेवून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर रॅलीसाठी मंजुरी दिली.

दिल्ली पोलिसांनी एका वरीष्ठ पदावरील अधिकाऱ्याने याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. “शनिवारी झालेल्या बैठकीत आम्ही शेतकऱ्यांसमोर अनेक पर्याय ठेवले होते. त्यांना जे पर्याय आवडले, ते पर्याय दिल्लीच्या शांततेत भंग करणारे नाहीत. त्यामुळे दोन्ही पक्षांनी समजुतदारपणे तोडगा काढला”, असं त्यांनी सांगितलं.

या ट्रॅक्टर रॅलीला दिल्ली पोलिसांचा नकार होता. त्यांनी या प्रकरणी सुप्रीम कोर्टातही धाव घेतली. मात्र, सुप्रीम कोर्टाने दिल्ली पोलिसांना याबाबत योग्य निर्णय घेण्याचे आदेश दिले. त्यामुळे अखेर दिल्ली पोलिसांना याबाबत निर्णय घेण्यास भाग पडावं लागलं.

Leave A Reply

Your email address will not be published.