विकासापासून वंचित असलेल्या हिंजवडी, माण, मारूंजी, जांबे, नेरे, सांगवडे, गहुंजे या सात गावांचा पिंपरी – चिंचवड महापालिका क्षेत्रात समावेश करण्याचा प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित आहे. या गावांचा समावेश करून पालिकेच्या हद्दवाढीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकारात्मक असल्याचे खासदार श्रीरंग बारणे यांनी म्हटले आहे. तसेच, प्रस्तावाबाबत प्रशासनाला सूचनाही केल्या आहेत. (PCMC)
खासदार बारणे यांनी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी महापालिका हद्दीलगत हिजवडी, माण, मारूजी, नेरे, जांभे, सांगवडे, गहुंजे ही गावे आहेत. या गावामध्ये माया प्रमाणात नागरीकरण झाले आहे. त्याठिकाणी मुलभूत सुविधांचा अभाव आहे.
आयटीनगरी असलेल्या हिंजवडी, माणचा विकास होणे गरजेचे आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे ग्रामपंचायतीला नागरिकांना सुविधा देणे शक्य होत नाही. सुविधांसाठी नागरिकांनी गावांचा पालिकत समावेश करण्याची मागणी केली मावळ, मुळशी तालुक्यात असलेली ही गावे पालिकेजवळ आहेत.
हिजवडी, माण या क्षेत्रात आयटी पार्क आहे. गावांचा विकास, नागरीकांना सर्व सोयी – सुविधा मिळाव्यात आणि अनाधिकृत बांधकाम रोखण्याच्या दृष्टीकोणातून हिजवडी, माण, मारूंजी, नेरे, जांबे, सांगवडे आणि गहुंजे या गावांचा महापालिका क्षेत्रात समावेश करावा, अशी मागणी त्यांनी यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली.
या संदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांनी सकारात्मक विचार करून लवकरच निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले. तसेच प्रशासनाला संबंधित प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश त्यांनी दिले असल्याचे बारणे म्हणाले.
आठ वर्षांपासून प्रस्ताव, आता पीएमआरडीएकडून विरोध
पिपरी पालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत असताना १० फेब्रुवारी २०१५ रोजी सर्वसाधारण सभेने सात गावांच्या समावेशाचा प्रस्ताव मंजूर करून राज्य शासनाला पाठविला होता. हा प्रस्ताव राज्य शासनाने एक वेळ नामंजूर केला. २०१७ मध्ये भाजप सत्तेत आल्यानंतर पालिकेने पुन्हा हा प्रस्ताव पाठवला. त्यानंतर प्रशासकीय कार्यवाही व अभिप्राय घेण्यात आले. यामध्ये पीएमआरडीए प्रशासनाकडून या गावांच्या पालिकेत समावेशाला विरोध करण्यात आला आहे. तर मागील आठ वर्षांपासून हा हद्दवाढीचा विषय नुसताच चर्चेत आहे.