देशातील शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या 16 व्या हप्त्याची अनेक दिवसांपासून वाट पाहत आहेत. आता शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 16 व्या हप्त्याची शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपली आहे. परंतु महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तर दुहेरी खुशखबर मिळणार आहे त्यांच्या खात्यात तब्बल 6,000 रुपये जमा होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत यवतमाळ येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा 16 वा हप्ता व महाराष्ट्र राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा व तिसऱ्या हप्त्यांचा एकत्रित लाभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरीत करण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्याकरिता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना फेब्रुवारीत सुरू केली आहे. या योजनेच्या निकषांनुसार पात्र शेतकरी कुटुंबास दोन हजार प्रती हप्त्याप्रमाणे तीन समान हप्त्यात प्रती वर्षी सहा हजार त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात या योजनेंतर्गत राज्यातील 113.60 लाख शेतकरी कुटुंबांना एकूण 15 हप्त्यांमध्ये 27 हजार 638 कोटींचा लाभ जमा झालेला आहे.
राज्यात पीएम किसान योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. राज्य शासनाने पीएम किसान योजनेच्या 14 व्या हप्याचा लाभ अदा झालेल्या राज्यातील 85.60 लाख शेतकरी कुटुंबाना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता रक्कम एक हजार 712 कोटी यापूर्वी अदा केलेला आहे. उर्वरीत दुसरा तिसरा हप्ता एकत्रितरित्या 28 फेब्रुवारीला यवतमाळ येथे पंतप्रधानांच्या हस्ते वितरीत करण्यात येणार आहे.
राज्याच्या योजनेमधून जवळपास 3,800 कोटी थेट शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा होणार आहे. पीएम किसान योजनेचे दोन हजार तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता मिळून 4 हजार असा 6 हजार रुपयांचा लाभ यवतमाळ येथून राज्यातील सुमारे 88 लाख पात्र शेतकऱ्यांना दिला जाणार आहे.
यवतमाळ येथे पीएम किसान योजनेच्या 16 व्या हप्त्याचा 1943.46 कोटींचा लाभ राज्यातील भूमि अभिलेख नोंदी अद्ययावत केलेल्या, बँक खाती आधार संलग्न केलेल्या व ई – केवायसी पूर्ण केलेल्या 87.96 लाख शेतकरी कुटुंबांच्या थेट हस्तांतरणाद्वारे जमा होणार आहे.
केंद्र शासनाने 28 फेब्रुवारी हा दिवस संपूर्ण देशभर पीएम किसान उत्सव दिवस म्हणून साजरा करण्याचे निर्देश दिले आहे. त्यानुसार आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी सर्व क्षेत्रिय अधिकाऱ्यांना जिल्हा, तालुका व गावपातळीवर तसेच कृषी विज्ञान केंद्रे, सामाईक सुविधा केंद्रे या ठिकाणी पीएम किसान उत्सव दिवस साजरा करण्याचे निर्देश दिले आहे..
हे काम त्वरित करा पूर्ण..
पीएम किसान योजनेअंतर्गत ई – केवायसी करणे देखील बंधनकारक आहे. फसवणूक टाळण्यासाठी आणि अपात्र शेतकऱ्यांची ओळख पटवण्यासाठी ई – केवायसी सुरू करण्यात आली आहे.परंतु, जर तुम्ही जमिनीची पडताळणी विहित मुदतीत केली नाही, तर तुम्हाला हप्त्याच्या लाभापासून वंचित राहावे लागू शकते. हे काम नियमानुसार होणे गरजेचे आहे. तुम्ही तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक केलेले नसले तरीही, तुम्ही हप्त्यांच्या लाभापासून वंचित राहू शकता..