बटाट्याचं पीक जमिनीत येतं हे तर सर्वांना माहितीच आहे. मात्र बटाटा झाडाला लगडला आहे असं जर तुम्हाला कुणी म्हटलं तर तुमचा यावर विश्वास बसणार नाही. परंतु ही अशक्य गोष्ट शक्य झाली आहे ती निरगुडसर ता. आंबेगाव येथील शेतकरी संदीप व धनेश पांडुरंग वळसे पाटील यांच्या शेतात. 

या दोन्ही भावंडांच्या शेतात चक्क एका झाडाला लहान मोठे असे तब्बल 17 ते 18 बटाटे लागल्याची घटना घडली आहे. दरम्यान झाडाला लागलेले बटाटे हा परिसरात चर्चेचा विषय बनला आहे.

बटाटे हे कंद प्रजातीचे पीक असल्याने जमिनीत निघतात हे सर्वश्रुत आहेच. परंतु या ठिकाणी तर झाडाच्या फांदीलाच एखाद्या फळाप्रमाणे चक्क बटाटे लगडलेले आहेत.

आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथील शेतकरी धनेश व संदीप पांडुरंग वळसे पाटील यांची निरगुडसर जवळ असलेल्या गण्या डोंगराच्या जवळ साडेतीन एकर क्षेत्र जमीन आहे. त्यामध्ये त्यांनी बटाटा पिकाची लागवड केली आहे. सध्या पीक काढणीला आल्याने त्यांनी पिकाचा पाला कापायला सुरूवात केली असताना एका झाडाला चक्क बटाटे आढळून आले आहेत.

यावेळी झाडाच्या फांद्यांना लहान मोठे असे चक्क १७ ते १८ बटाटे आढळून आले. जमिनीत येणाऱ्या बटाट्या प्रमाणेच हे बटाटे आहेत, मात्र थंडीमुळे थंडेसे हिरव्या रंगाचे झाले आहेत. झाडाला बटाटे आढळून आल्याने परिसरात मोठ्या कुतूहलाचा विषय बनला आहे. हे बटाटे पाहण्यासाठी परिसरातील शेतकरी, नागरिक मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *