एक वर्षापासून पाच वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांची थकबाकी असताना तिचा भरणा न केलेल्या थकबाकीदारांनी ही थकबाकी येत्या 26 तारखेपूर्वी संबंधित तलाठी कार्यालयात जमा न केल्यास मालमत्तांच्या इतर अधिकारात ‘थकबाकी वसुलीपोटी जप्त’ असा शेरा दाखल करण्यात येऊन सदर मिळकत शासन जमा करण्याचे आदेश तालुक्यातील सर्व मंडल अधिकारी व तलाठी यांना उपविभागीय अधिकारी हेमांगी पाटील यांनी दिले आहेत.
या आदेशात म्हटले आहे की, तालुक्यातील सर्व खातेदारांनी सन 2023-2024 या महसुली वर्षाकरीता आपणाकडे असलेला अकृषिक सारा आणि इतर अनुषंगिक कर दि. 26 फेब्रुवारी 2024 पर्यंत शासनाकडे जमा करावा.
ही रक्कम मुदतीत शासनाकडे जमा न केल्यास महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 176 ते 182 मधील प्रचलित तरतुदीनुसार कारवाई सुरु करण्यात येईल, असे आदेशात म्हटले आहे.
दरम्यान, यात एक वर्षांपासून ते तीन वर्षे, पाच वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांची थकबाकी असली तरीही तिचा भरणा करणे बंधनकारक असून, ही थकबाकी दि. 26 पूर्वीच संबंधित तलाठी यांच्याकडे भरणा करणे आवश्यक आहे.
तसेच ज्या मालमत्ताधारक, व्यावसायिकांनी दोन दिवसांत अकृषिक कर न भरल्यास मालमत्तांच्या इतर अधिकारात थकबाकी वसुलीपोटी जप्त असा शेरा दाखल करण्यात येऊन ही मिळकत शासन जमा करण्याचे आदेश तालुक्यातील सर्व मंडल अधिकारी व तलाठी यांना देण्यात आले आहेत.
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाच्या कलमामधील प्रचलित तरतुदीनुसार थकबाकीदार मालमत्ताधारकांवर कारवाई करण्यात येईल. त्यामुळे खातेदारांनी लवकरात लवकर थकबाकी भरून सहकार्य करावे.
सुरेंद्र देशमुख, तहसिलदार
सिन्नर थकबाकीदार मालमत्ताधारकांनी कारवाई टाळण्यासाठी तलाठी कार्यालयात थकबाकी भरून शासनास सहकार्य करावे; अन्यथा वरिष्ठ कार्यालयाकडून आलेल्या आदेशानुसार पुढील कार्यवाही केली जाईल.
स्वरूप गोराणे, तलाठी, सिन्नर