पुणे-बंगळूर ग्रीनफिल्ड महामार्ग : शेतकऱ्यांच्या घरी येणार आर्थिक गंगा, प्रति गुंठा मिळणार 5 ते 7 लाखांपर्यंत दर, पहा, गावांची नावे अन् रोडमॅप
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) भारतमाला प्रकल्पांतर्गत पुणे बंगलोर एक्सप्रेस-वे ग्रीनफिल्ड महामार्गासाठीच्या बांधकामाचा प्रस्ताव मंजूर केला असून सातारा, सांगली जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यातून जाणाऱ्या ग्रीन कॉरिडॉर महामार्गासाठी गावनिहाय जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे.
हा ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस वे सध्याच्या राष्ट्रीय महामार्ग 48 (जुना NH 4) चा एक जलद पर्याय असणार आहे. आणि त्यामुळे वाहतूक आणि गर्दी कमी होईल अशी अपेक्षा आहे. 120 किमी / तास या वेगाला सपोर्ट करणारा, नवीन पुणे बंगळुरू ग्रीनफिल्ड महामार्ग हा आठ लेनचा प्रवेश नियंत्रित एक्सप्रेस – वे असणार आहे.
पण, त्यापूर्वीच या महामार्गालगत असलेल्या दुष्काळी भागातील जमिनीला सोन्याचा भाव येणार असल्याची चिन्हे दिसत आहे. काहींनी हा महामार्ग होणार, हे पाहून या परिसरातील जमिनी खरेदी करण्याचा सपाटा लावला आहे. त्यासाठी जमिनींची खरेदी, विक्री करणारे एजंटही सक्रिय झाले आहेत.
सध्याच्या राष्ट्रीय महामार्गावर वाढता भार पाहता त्याला पर्याय म्हणून पुणे- बंगळूर द्रुतगती महामार्ग होत आहे. या प्रकल्पाची किंमत सुमारे 31 हजार कोटी रुपये असून याची एकूण लांबी 745 किलोमीटर लांबीचा हा द्रुतगती महामार्ग बांधण्यात येत आहे. त्यासाठीची अधिसूचना देखील काढण्यात आली आहे.
सातारा व सांगली जिल्ह्यातल्या गावांतील जमिनीच्या भूसंपादनाची प्रक्रिया लवकरच सुरू होत असून. ज्या गावांतून हा ग्रीन महामार्ग जाणार आहे त्या गावांची यादी निश्चित झाली आहेत.
त्यामध्ये कोरेगाव तालुक्यातील भादळे, हासेवाडी, नागेवाडी, घोडेवाडी, भादळे फॉरेस्ट. फलटण तालुक्यातील सासरे, शेरेचीवाडी, हिंगणगाव, आदर्की बुद्रुक. खंडाळा तालुक्यातील शिरवळ, पिसाळवाडी, डांगेवाडी, माने कॉलनी, भोळी, शेखमिरवाडी, भादवडे, बावडा, शिवाजीनगर, म्हावशी, अहिरे, धावडवाडी, घाटदरे, सुखेड, खेड बुद्रुक, निंबोडी, कोपर्डे या गावांची नावे समाविष्ट झाली आहेत.
तर खटाव तालुक्यातील चिंचणी, डिस्कळ, काळेवाडी, अनपटवाडी, शेंडेवाडी, ललगुण, काटेवाडी, फडतरवाडी बुद्रुक, बुध, फडतरवाडी, वेटणे, फडतरवाडी, पुसेगाव, कटगुण, खटाव, दरुज, भुरकवडी, धाकरवाडी, सिध्देश्वर कुरोली, वाकेश्वर, वडूज, ऊंबर्डे, नायकाचीवाडी, गुरसाळे, सिरसाळवाडी, अंबवडे, गोऱ्हेगाव-निमसोड, पोफळकरवाडी, मरडवाक, मोराळे, गुंडेवाडी, शेंडगेवाडी, मायणीचा समावेश आहे. तेथून पुढे हा महामार्ग सांगली जिल्ह्यात प्रवेश करणार आहे.
या गावांतील नेमकी कोणती जमीन जाणार, हे अद्यापही स्पष्ट झाले नसले तरी हे सर्व रस्त्यासाठी येणाऱ्या भूसंपादनाच्या नोटिसीनंतरच समजणार आहे. जिल्ह्यातील भूसंपादनाची प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तशी सूचना निघेल. पण, हा महामार्ग ज्या गावांतून जाणार आहे त्या गावांच्या परिसरात असलेल्या जमिनींचे भाव यामुळे वाढले आहेत. एरव्ही काही हजारांत गुंठा असलेल्या या जमिनीला आता सोन्याचा भाव मिळत आहे.
गुंठ्याला 5 ते 7 लाखांपर्यंत हा दर जाणार आहे. त्यामुळे या परिसरात जमिनी खरेदीसाठी एजंटांची पावले वळू लागली आहेत. त्यामुळे भविष्यात हा महामार्ग जाणाऱ्या परिसरात जमीन खरेदी-विक्रीचे कोट्यवधींचे व्यवहार होऊ शकतात. पण, हा महामार्ग जाणार, याची कानकुन लागल्यानंतर यापूर्वीच कवडीमोल भावात काही हजार एकरात जमिनींची खरेदी झाली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आगामी पाच ते सहा महिन्यांच्या कालावधीत खटाव, फलटण, खंडाळा तालुक्यांतील महामार्गाच्या परिसरातील जमिनींना सोन्याचा भाव मिळेल अशी चर्चा सर्वत्र आहे.
दुष्काळी भागातील जमिनींना मिळणार दर. . .
खंडाळा तालुक्यात एमआयडीसी आल्यानंतर तेथील जमिनीचेही दर वाढले. परिणामी काहींनी मोठ्या प्रमाणात जमिनी खरेदी करून ठेवल्या आहेत. त्यामध्ये महामार्गाच्या लगतही मोठ्या प्रमाणात जमिनींची खरेदी-विक्री झालेली दिसून येत आहे. आता या दुष्काळी भागातील जमिनींना या निमित्ताने चांगला दर मिळणार आहे.