भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून (NHAI) पुण्यातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या चांदणी चौकात (NDA) उभारण्यात येत असलेल्या नव्या उड्डाणपुलाचे उद्घाटन केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते 12 ऑगस्टला करण्यात येणार आहे. हे काम अंतिम टप्प्यात असून, या कामाची मंगळवारी (दि. 11 जुलै) जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पाहणी केली.

जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी कामाची पाहणी करून नवीन व्हीओपीच्या सद्य:स्थितीतील कामाबद्दल चौकातील इतर कामाबद्दल आढावा घेतला. या वेळी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम, प्रकल्प व्यवस्थापक श्रीनिवास, प्रकल्प समन्वयक किशोर भरेकर, एनएचएआय सल्लागार अभियंता भारत तोडकरी, सुरक्षा अधिकारी कुंदन कुणाल आदी या वेळी उपस्थित होते.

एनडीए चौक हा पुण्यातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. याठिकाणाहून सातारा – मुंबई महामार्ग, पाषाण, बावधन, मुळशी या सर्व भागांतील वाहतूक एनडीए चौकात एकत्र येते. या ठिकाणी एकच पूल असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती.

गेल्या वर्षभरात प्रकल्पाचे बरेच काम पूर्ण झाले आहे. प्रकल्पातील मुख्य अडचणी म्हणजे रखडलेले भूसंपादन, सेवा वाहिन्यांचे स्थलांतर न्यायालयीन प्रकरणे आणि स्थानिक अतिक्रमणे आदी अडचणींवर मात करत गतीने काम पूर्ण करण्यात येत आहे. सध्या पुलाचे गर्डर टाकण्याचे काम सुरू आहे. पुढील महिन्यात उड्डाण पुलाचे लोकार्पण करण्याचे नियोजन असून, त्यादृष्टीने कामे पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे जिल्हाधिकारी डॉ . देशमुख यांनी सांगितले.

व्हीओपी कामांतर्गत स्तंभाच्या तुळईचे (बिम ऑफ कॉलम) काम पूर्ण झाले आहे. दोन्ही बाजूच्या सेवा रस्त्यावरील एकूण 32 गर्डरपैकी (गर्डर लांबी 22 ते 35 मी) 25 गर्डरचे काम पूर्ण झाले आहे. मुख्य रस्त्यावरचे नऊ पैकी पाच गर्डरचे (गर्डरची लांबी 57.5 मी) काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम प्रगतिपथावर आहे.

सेवा रस्त्याच्या चार स्पॅनचे स्लॅब पूर्ण झाले आहेत. मुख्य रस्त्यावरील स्लॅब बांधणीचे काम सुरू असून इतर कामे प्रगतिपथावर आहेत, असेही जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी स्पष्ट केले.

एनडीए चौक प्रकल्पाचे एकूण 95 टक्के काम पूर्ण झाले असून, लवकरच काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे, असे NHAI चे प्रकल्प संचालक कदम यांनी सांगितले. तर, नव्या उड्डाणपुलाचे सर्व गर्डर टाकण्याचे काम पूर्ण झाले असून, प्लास्टर करण्याचे काम बाकी आहे. हे काम महिनाअखेरीस पूर्ण होईल.

12 ऑगस्टला केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उड्डाणपुलाचे उद्घाटन करण्याचे नियोजित आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आदी मान्यवर उपस्थित राहतील. अशी माहिती NHAI चे सल्लागार अभियंता भारत तोडकरी यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *