वाळू उत्खननाला आळा घालण्याच्या उद्देशाने वाळू, रेतीचे उत्खनन, साठवणूक व विक्री व्यवस्थापन करण्यासाठी शासनाने नवीन वाळू धोरण जाहीर केले आहे. या धोरणानुसार राज्यात तालुकानिहाय ठिकठिकाणी वाळू डेपो तयार करण्यात आले आहे. या डेपोवरुन नागरिकांना प्रती ब्रास 600 रुपये म्हणजे प्रति टन 133 रुपये दराने 50 टनापर्यंत वाळू मिळणार आहे.
अधिक इतर कर 77 रुपये याप्रमाणे डेपोत उपलब्ध होणाऱ्या वाळूच्या प्रमाणात ऑनलाईन प्रणालीवरुन वाळू खरेदी करता येणार आहे.
नागरिकांनी https://mahakhanij.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया पूर्ण करुन स्वस्त वाळू खरेदीसाठी पुढे यावे, असे आवाहन राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या दि.19 एप्रिल 23 च्या शासन निर्णयान्वये नागरिकांना बांधकामासाठी योग्य वाळू स्वस्त दराने उपलब्ध करुन देण्यासाठी पुणे जिल्ह्यातील जलसंपदा विभागातर्फे जिल्ह्यातील 26 नद्यांची ठिकाणे निश्चित करून देण्यात आली असून, या नद्यांमधून वाळूउपसा करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे, तर संबंधित वाळू लिलावासाठी जिल्हा खनिकर्म विभागामार्फत 18 जुलैपर्यंत ई – निविदा मागविल्या आहेत.
पुणे जिल्ह्यातील या डेपोंत मिळणार वाळू..
जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार : दौंड, हवेली, बारामती, जुन्नर, पुरंदर, आंबेगाव , शिरूर आणि खेड तालुक्यातून जाणाऱ्या भीमा नदी, मुळा – मुठा, नीरा नदी, घोड नदी, कऱ्हा नदी, मीना नदीपात्रातून गाळमिश्रित वाळूउपसा आणि डेपो करण्याचे ठिकाण निश्चित केले आहेत बारामती तालुक्यात नीरा नदीवर मुरूम, बाणेवाडी येथे वाळूउपसा करण्याचे ठिकाण निश्चित केले आहेत.
जुन्नरमधील मीना नदीवरील निरगुडे आणि बेलसर, पुरंदर तालुक्यातील कऱ्हा नदीवर कुंभारवळण, एखतपूर, खानवडी, नाझरे सुपे, नाझरे क.प., जवळार्जुन आणि पांडेश्वर येथे वाळू डेपो केला जाणार आहे.
आंबेगाव तालुक्यातील घोड नदीवर देवगाव, लाखणगाव, काठापूर बु., पारगाव तर्फे अवसरी बु., चिचोडी, तर भीमा नदीवरील मांडगाव फराटा आणि सादलगाव खेडमधील भीमा नदीवर पाडळी येथे वाळूउपसा आणि डेपो केला जाणार आहे. त्यानुसार वाळू डेपो निश्चित करण्यात आले असून, ई – निविदा पद्धतीने वाळूविक्री करण्यात येणार आहे. निविदा खरेदी, अनामत रक्कम भरणे यासाठी 18 जुलै रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत करता येणार आहे. तर, 19 जुलै रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत मुदत दिली आहे.
असा सोप्या पद्धतीने करा ऑनलाईन अर्ज..
स्टेप -1 : वाळू धोरण – 2023 नुसार बुकींग करण्यासाठी प्रथम इंटरनेट ब्राऊजरवर https://mahakhanij.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.
स्टेप – 2 : संकेतस्थळ ओपन झाल्यानंतर वरील बाजूस सॅन्ड बुकींग (SAND BOOKING) असे ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करावे. सॅन्ड बुकींगवर क्लिक केल्यानंतर संकेतस्थळ नवीन विंडोमध्ये उघडेल. त्यानंतर लॉग इन या बटनावर क्लिक करावे.
स्टेप -3 : त्यानंतर CONSUMER SIGN UP कन्सुमर साइन अप वर क्लिक करुन आवश्यक ती माहिती भरावी. जसे नाव, मोबाईल क्रमांक व स्वतःचा ई – मेल आयडी इ. माहिती भरावी.
स्टेप – 4 : रजिस्ट्रेशन झाल्यानंतर लॉगइन मध्ये युजर नेम म्हणजे तुम्ही रजिस्ट्रेशन करते वेळी दिलेला मोबाईल क्रमांक व मोबाईलमध्ये प्राप्त झालेला पासवर्ड (OTP) टाकून लॉग इन करावे. त्यानंतर प्रोजेक्ट रजिस्ट्रेशनमध्ये आपले घर, इमारत, घरकुल इत्यादी माहिती भरुन प्रोजेक्ट रजिस्टर करावा.
स्टेप – 5 : त्यानंतर आपल्याला प्रोजेक्टसाठी आवश्यक असलेल्या वाळूची बुकींग करावी. आपल्या जवळील अथवा संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या ठिकाणाचा स्टॉकयार्ड (STOCKYARD) निवडावा.
स्टेप – 6 : शेवटी ऑनलाइन पावतीने बुकींग केलेल्या वाळूचे पेमेंट करुन त्याची प्रत प्राप्त करुन घ्यावी. संबंधित स्टॉकयार्ड ( STOCKYARD ) वर जावून पैसे भरल्याची प्रत जमा करुन वाळू प्राप्त करुन घ्यावी. याप्रमाणे ऑनलाईन अर्जाची प्रक्रीया पूर्ण करुन वाळू प्राप्त करुन घ्यावी असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.