देशभरातील प्रमुख शहरांपैकी पुणे शहरात गेल्या तीन महिन्यांच्या काळात सर्वाधिक घरांची विक्री झाल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. दिल्ली, कोलकाता, बंगळुरू, मुंबईपेक्षाही पुणे शहरात घर खरेदी करणाऱ्यांची संख्या सर्वात जास्त आहे.
फ्लॅटच्या किमती आणि आपले बजेट आणि इतर वेगवेगळ्या सुविधा आदी कारणांमुळे पुण्यात घर खरेदी करण्यास सर्वसामान्य लोक प्राधान्य देत असल्याचे पाहणीत आढळून आले आहे. पुणे शहरातील वेगाने विकसित होणारे एक उपनगर म्हणून लोहगावकडे पाहिले जात आहे. मोठमोठ्या नामांकित बांधकाम व्यावसायिकांचे (बिल्डर) लोहगावमध्ये अनेक प्रकल्प सुरू असून, येत्या दोन ते तीन वर्षांत ते पूर्णत्वास जाणार आहेत.
लोहगावला जाण्यासाठी प्रामुख्याने विमाननगर- लोहगाव रस्ता, येरवडा- लोहगाव रस्ता, टिंगरेनगर- धानोरी- लोहगाव रस्ता, वाघोली- लोहगाव रस्ता, आळंदी चन्होली- लोहगाव रस्ता तसेच मरकळ – वडगाव शिंदे – लोहगाव रस्ता आदी महत्वाच्या रस्त्यांचे जाळे आहे. लोहगावमध्ये देशांतर्गत, तसेच आंतरराष्ट्रीय सेवा पुरवणारे विमानतळ आहे.
देशातील विविध शहरासह येथून मध्य अशियातील प्रमुख शहरांमध्ये आंतरराष्ट्रीय विमानसेवा पुरवली जात आहे. लोहगाव परिसरातील नागरिकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने 6 एकर जागेत 100 खाटांचे (बेड) उपजिल्हा रुग्णालय व निवासस्थानाचे बांधकाम करण्यात येत आहे. सध्यस्थितीत 90 टक्के बांधकाम पूर्ण झाले असून रुग्णालयाची उर्वरित कामे येत्या जानेवारी 2024 अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे.
लोहगावमध्ये नामांकित शैक्षणिक संस्थांचे कॉलेज कॅम्पस असून, राज्यातील विविध जिल्ह्यासह देश – परदेशातील विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. जसे की सिम्बायोसिस अभिमत विद्यापीठ कॅम्पस, मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज कॅम्पस, डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज कॅम्पस, संत तुकाराम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आहे.
तसेच राज्य बोर्डाबरोबरच केंद्रीय बोर्डाच्या (सीबीएसई) शाळा देखील याठिकाणी आहेत. लोहगावच्या काही भागामध्ये रेडीरेकनरचा दर हा वेगवेगळा आहे. पोरवाल रस्ता आणि कॉलेज परिसरात 1200 ते 1500 रुपयांचा दर आहे. तर उर्वरित भागामध्ये 800 ते 1200 रुपयांचा दर आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना या भागात परवडणारी घरे उपलब्ध होत असल्याने नागरिकांची पसंती मिळत आहे.
फ्लॅटच्या किंमती पहा..
1 बीएचके :- 14 ते 25 लाख
2 बीएचके :- 22 ते 35 लाख
3 बीएचके बंगलो (प्लॉट) :- 35 ते 55 लाख
रेडी रेकनरचे रेट (प्रति स्क्वेअर फूट) – 800 ते 2000
साईट लिंक :- amanora.com
पुण्यामध्ये घर घेणाऱ्यांकरिता दिवाळीनिमित्त खास सदर..
पुणे शहराचा झपाट्याने विकास होत असल्यामुळे या ठिकाणी जागा किंवा फ्लॅट यांच्या किमती सर्वसामान्य व्यक्तीच्या आवाक्याबाहेर गेलेले आहेत. त्यामुळे पुण्याच्या उपनगरांत आता बिल्डर, नागरिकांनी मोर्चा वळवला.पुण्याच्या चारही बाजूंनी सध्या निवासी आणि व्यावसायिक अनेक मोठ्या प्रकल्पाची उभारणी करण्यात येत आहेत.
आपल्यापैकी बरेच जण बजेटमध्ये कुठे फ्लॅट किंवा घर मिळेल का ? याचा सतत शोध घेत असतो. पुण्यातील वेगाने विकसित हाणाऱ्या उपनगराबद्दल माहिती उपलब्ध करून देण्यात येत आहे ज्या ठिकाणी स्वस्तात फ्लॅट मिळू शकतात, अशी माहिती आपण पहिली आहे.
पुणे महापालिकेत लोहगावचा 2017 साली समावेश झाला आहे. आजच्या घडीला लाखांच्या पुढे लोकसंख्या झाली आहे. तसेच दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहे. परंतु, पुणे महापालिका केवळ कर गोळा करण्यापलीकडे लोहगावला काहीही सुविधा देत नाहीत. अंतर्गत रस्त्याची दुरवस्था झाली असू , त्याची तावडीने दुरुस्ती करणे गरजेचे आहे.
अद्यापही शाळा आणि आरोग्य केंद्र पुणे जिल्हा परिषदेकडेच ठेवण्यात आले आहेत. पाच वर्षांपूर्वी लोहगावला आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळायच्या. परंतु, आता जिल्हा परिषदेकडे आरोग्य केंद्र असूनही ते काहीही सुविधा देत नाहीत तर दुसरीकडे पुणे महापालिका दुर्लक्ष करत आहे. पुणे महापालिकेने आणखी चांगल्या सुविधा दिल्या. तर लोहगावकडे नागरिकांचा आणखी ओढा वाढणार आहे.
– राजेंद्र खांदवे, व्यावसायिक