पिंपरी – चिंचवड शहरातील सार्वजनिक प्रवासी वाहतूक सक्षम करण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या मेट्रोच्या पिंपरी ते निगडीपर्यंत विस्तार करण्यासाठी केंद्रीय गृहनिर्माण व नागरी कामकाज मंत्रालयाने कन्स्ट्रक्शन टेंडर जारी केलं आहे. त्यामुळे आता मेट्रोच्या कामाला गती मिळाली असून नव्या वर्षात या मार्गाच्या बांधकामाचा श्रीगणेशा होणार आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून शहरवासीयांच्या मागणीला अखेर यश आले आहे. पिंपरी ते निगडी (भक्ती – शक्ती) चौकापर्यंत मेट्रोचा विस्तार करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने 23 ऑक्टोबर रोजी मंजुरी दिली होती.
पहिल्या टप्प्यात पिंपरी ते दापोडी हा 7.9 किमीचा मार्ग 1 ऑगस्ट 2023 पासून सुरू करण्यात आला. तर, पिंपरी ते फुगेवाडी हा मार्ग 6 मार्च 2022 पासून सुरू झाला आहे. या रस्त्याच्या कामासोबतच पिंपरी ते निगडी या 4.13 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे कामही सुरू करावे, अशी विनंती शहरातील नागरिकांनी केली होती.
दरम्यान, राज्य सरकारने निगडीपर्यंतच्या मेट्रो मार्गाला 23 ऑक्टोबर रोजी मंजुरी दिली होती. परंतु प्रत्यक्ष बांधकामाला कधी सुरवात होईल ? हा प्रश शहरवासीयां समोर होता. अशा स्थितीत आता निगडीपर्यंत मेट्रोच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे.
असा असणार मार्ग ? पहा रूट मॅप आणि स्टेशन्स..
पिंपरी ते निगडी या विस्तारित मेट्रो मार्गात 3 स्टेशन्स, चिंचवड स्टेशन्समधील पिंपरी पोलीस ठाणे, आकुर्डी येथील खंडोबा मॉल चौक आणि निगडी येथील भक्ती-शक्ती समूह शिल्प चौक आहे. हा मार्ग 4.13 किमी लांबीचा असून तो एव्हीलेटेड कॉरिडॉर रूट असणार आहे. या प्रोजेक्टसाठी केंद्र सरकार आणि पिंपरीचिंचवड महापालिका समप्रमाणात खर्च करणार आहे. त्यामुळे निगडी ते दापोडी या मुख्य रस्त्यावर 12.50 किमीची मेट्रो प्रवासी सेवा उपलब्ध होणार आहे..
910 कोटींचा होणार खर्च..
महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी सांगितले की, महा मेट्रोने कामाला गती देण्यासाठी तसेच प्रकल्पाच्या सामाजिक परिणामाचे मूल्यांकन करण्यासाठी सल्लागार नेमण्यासाठी यापूर्वीच निविदा जारी केली आहे. आता या मार्गासाठी सिव्हिल, इलेक्ट्रिकल आणि सिग्नलच्या कामांसाठीही निविदा निघाल्या असून कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
या मार्गाची एकूण लांबी 4.4 किमी आहे. हा मार्ग पूर्णपणे उन्नत होणार आहे. या मार्गावर चिंचवड, आकुर्डी आणि निगडी अशी तीन स्थानके असतील. या मार्गाचा एकूण खर्च 910.18 कोटी रुपये आहे. ते म्हणाले, या मार्गाचे काम 130 आठवड्यांत काम पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.