पुणे – नाशिक रेल्वे शिर्डीकडून वळविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे संगमनेरकरांमध्ये प्रचंड नाराजी असून, आ. सत्यजीत तांबे यांनी या असंतोषाला वाचा फोडली आहे. या मार्गाच्या मूळ आराखड्यानुसार ता संगमनेर तालुक्यातून जाणे अपेक्षित असताना ऐनवेळी हा बदल का केला, असा प्रश्न आ. तांबे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन उपस्थित केला.
रेल्वेमागांच्या मूळ आराखड्यात कोणताही बदल न करता तो संगमनेरमधूनच नेण्यात यावा, अशी आग्रही मागणी करणारे पत्र त्यांनी यावेळी दिले. पुणे – नाशिक या दोन महानगरांना जोडणारा रेल्वेमार्ग महारेलच्या माध्यमातून उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.
हा मार्ग संगमनेर तालुक्यातून जाण्याचे नियोजन झाले होते. या रेल्वेमार्गामुळे पुण्यातील चाकण, भोसरी आणि नाशिक जिल्ह्यातील सिन्नर आणि मुसळगाव या चार औद्योगिक वसाहता जाडल्या जाणार आहेत.
त्यामुळे संगमनेर तालुक्यासह इतर भागातील तरुणांना रोजगाराच्या सधा अधिक प्रमाणात उपलब्ध होण्याची शक्यता होती. संगमनेर देशाच्या रेल्वेच्या नकाशावर येणार असल्याने आणि त्यामुळे तालुक्यात समृद्धी येणार असल्याने संगमनेरकरांनी या रेल्वेमार्गाचे स्वागत केले, असे आ. तांबे यांनी ना. देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिले.
राज्य सरकारने महारेलच्या माध्यमातून सिन्नर व संगमनेर तालुक्यात भूसंपादनही केले आहे. एकट्या संगमनेरमधून 103 खरेदीखतांद्वारे थेट शेतकऱ्यांकडून जमिनी खरेदी करण्यात आल्या. असे असताना अचानक या मागांत बदल करत तो संगमनेरऐवजी राजगुरूनगरवरून थेट शिर्डीकडे वळविण्याचा निर्णय का घेतला ?
या निर्णयामुळे संगमनेरकरांचे मोठे नुकसान होणार असून, जनतेत प्रचंड रोषाचे वातावरण आहे, असे आ. तांबे यांनी निदर्शनास आणून दिले.
बदल कोणाच्या सूचनेनुसार ?
ज्या मार्गासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात 2,424 कोटी रुपयांची तरतूद झाली आहे. ज्या मार्गासाठी एकट्या संगमनेर तालुक्यातील 103 शेतजमिनी खरेदीखत देत ताब्यात घेण्यात आल्या. तो मार्ग ऐनवेळी शिर्डीमार्गे वळवण्याचा निर्णय राज्य सरकारने कोणाच्या सूचनेनुसार घेतला. असा प्रश्नही आ. तांबे यांनी उपस्थित केला आहे.
मूळ आराखडा बदलून अचानक एखादा रेल्वे प्रकल्प दुसऱ्या मार्गाने वळविणे सोपे असते का? याबाबतचा शक्यता अहवाल तपासण्यात आला का, असे अनेक प्रश्न आ. तांबे यांनी उपस्थित केले.