Pune Onion market : कांद्याच्या भावात मोठी घसरण, पुणे बाजारसमितीत प्रति 10 किलोला मिळतोय इतका दर, पहा बाजारभाव..
घाऊक बाजारात गेल्या महिन्याच्या तुलनेत नव्या कांद्याच्या भावात तब्बल पाच रुपयांनी घट झाली सद्यःस्थितीत दररोज 80 ते 100 ट्रक कांद्याची असून आवक होत आहे. गेल्या महिन्यात 150 ते 180 रुपये प्रति दहा किलोला भाव मिळत होता, तो सध्या 100 ते 130 रुपये भाव मिळत आहे.
जुन्या कांद्याची आवक घटल्याने घाऊक आणि किरकोळ बाजारात कांद्याचे दर वाढले होते. मात्र, आता जुना कांदा संपत आला आहे. नव्या कांद्याची आवक सुरू झाली आहे. मागणीच्या तुलनेत आवक अधिक होत असल्याने दरात आणखी घट झाली आहे. घाऊक बाजारात घट झाल्याने किरकोळ बाजारातही घट झाली आहे. किरकोळ बाजारात 15 ते 20 रुपये प्रतिकिलोने विक्री केली जात आहे. सद्यःस्थितीत मार्केटयार्डातील कांदा- बटाटा विभागात 80 ते 100 ट्रक इतकी आवक होत आहे.
ही आवक पुणे जिल्ह्यातील खेड, जुन्नर, आंबेगाव, शिरूर या भागातून, तर नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा आणि संगमनेर भागातून होत आहे. कांद्याच्या पिकासाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळे पीक चांगले आहे. बाजारात दाखल होणाऱ्या नव्या कांद्याचा दर्जाही चांगला आहे. घाऊक बाजारात प्रतिकिलोला 11 ते 13 रुपये दर मिळत आहे.
मागील आठवड्यात 13 ते 16 रुपये दर मिळत होता. तर, गेल्या महिन्यात 15 ते 18 रुपये प्रतिकिलोला दर मिळत होता. राज्यातील कांद्याला दक्षिण भारतातून मोठी मागणी असते. मात्र, दक्षिण भारतातील काही राज्यात कादा उपलब्ध आहे. त्यामुळे दक्षिण भारतातून कांद्याला होणारी मागणी नेहमीच्या तुलनेत कमीच आहे.
तसेच, मध्य भारतातील काही राज्यातून अद्यापही कांद्याला मागणी वाढलेली नाही. त्यामुळे बाजारात विक्रीसाठी आलेला कांदा शहरासह परिसरातील व्यापारी खरेदी करत आहेत. आवकेच्या तुलनेत खरेदी कमीच होत आहे. त्यामुळे कांद्याचे दर घटत असल्याचेही व्यापाऱ्यांनी सांगितले.
गेल्या महिन्याच्या तुलनेत कांद्याच्या भावात सध्या तब्बल पाच रुपयांची घसरण झाली आहे. सद्यःस्थितीत मार्केटयार्डात दररोज 80 ते 100 ट्रक इतकी आवक होत आहे. काही प्रमाणात आवक वाढल्याने परिणामी मागणी घटल्याने भावात घसरण झाली आहे.
रितेश पोमण, व्यापारी, कांदा विभाग, मार्केटयार्ड
दक्षिण भारतातील काही राज्यांतील बाजारपेठांमध्ये कांद्याची आवक जास्त आहेत. त्यामुळे तेथून होणारी मागणी कमी झाली आहे. त्यामुळे कांद्याच्या भावात गेल्या महिन्याच्या तुलनेत घाऊक बाजारात प्रतिकिलोमागे पाच रुपयांनी घट झाली आहे.
गणेश यादव, व्यापारी, कांदा विभाग, मार्केटयार्ड, पुणे
शिरूरमध्ये शनिवार वगळता दररोज कांद्याचा लिलाव..
शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन मार्केटयार्डमध्ये परिसरातील शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक वाढल्याने आता बाजार समितीने शनिवार वगळता दररोज कांदा लिलाव सुरु केला आहे, अशी माहिती शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक तथा सहाय्यक निबंधक शंकर कुंभार यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे. रविवार ते शुक्रवार दररोज सकाळी 10 च्या आत हा कांदा लिलाव सुरु झाला आहे, अशीही माहिती यात देण्यात आली आहे.
यापूर्वी शिरुर मार्केटयार्डमध्ये ठराविक दिवसचं कांद्याचा लिलाव होत होता, त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण व कुचंबना होत असल्याने अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांनी दररोज कांदा लिलाव घेण्याची मागणी केली होती, त्यानुसार आता शनिवार वगळता दररोज कांदा लिलाव सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद..
सध्या बाजार समितीच्या या लिलावासाठी शिरुर, पारनेर , श्रीगोंदा व परिसरातून मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. शेतकऱ्यांनी कांदा विक्रीसाठी आणताना वाळवुन, निवडून, गुलटी, दुभळका वेगवेगळ्या बारदाण्यात प्रतवारी करुन आणावा असे आवाहनही यात कुंभार यांनी केले आहे. शेतकऱ्यांचा माल मार्केट यार्डमध्येच विक्रीसाठी आणावा, बांधावर कांदा विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून फसवणुक होत असल्याच्या तक्रारी बाजार समितीकडे येत आहेत, ही फसवणुक टाळण्यासाठी कांदा बाजार समितीतचं आणावा, असेही आवाहन यात करण्यात आले आहे. बाजार समितीने शेतकऱ्यांचा कांदा उतरविण्यासाठी प्रशस्त अशा चार शेडची व्यवस्था केली आहे.