देशातली सर्वात महागडी ट्रेन CSMT – नाशिक – साईनगर शिर्डी रूटवर..! तिकीट दरही जाहीर, पहा दोन्ही रुटवरील टाइम टेबल अन् खासियत..
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून शिर्डी आणि सोलापूरसाठी सुटणाऱ्या दोन्ही वंदे भारत गाड्या या मार्गावरील सर्वात महागड्या रेल गाड्या असणार आहे. यापूर्वी पश्चिम रेल्वेवर वंदे भारत ट्रेन मुंबई ते गांधीनगर धावली होती, जी महागडी असूनही वेट लिस्टेड धावत आहे. अशा परिस्थितीत 11 फेब्रुवारीपासून सुरू होणारी वंदे भारत लोकांमध्येही खूप लोकप्रिय होईल, अशी रेल्वेला आशा आहे. 10 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान सीएसएमटी येथून दोन्ही वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार असून 11 फेब्रुवारीपासून सामान्य प्रवासी या गाड्यांमध्ये बुकिंग करू शकणार आहे.
मध्य रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन वंदे भारतांपैकी मुंबई – शिर्डी वंदे भारत अधिक लोकप्रिय होणार असून या मार्गावरील नाशिक आणि शिर्डी ही दोन्ही ठिकाणे पर्यटकांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय आहेत. त्याचप्रमाणे मुंबई ते सोलापूर मार्गावरील मुंबई ते पुणे आणि पुणे ते सोलापूर विभाग लोकांमध्ये लोकप्रिय होऊ शकते.
या रूट्सवरून धावण्यास इतकं आहे तिकीट..
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई ते पुणे दरम्यान चेअर कारचे (CC) भाडे 560 रुपये आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कार (EC) चे भाडे 1165 रुपये असणार आहे. CSMT ते सोलापूर सीसी (CC) चे भाडे 965 रुपये आणि ईसीचे (EC) भाडे 1970 रुपये असणार आहे. या भाड्यात केटरिंग शुल्क स्वतंत्रपणे जोडलं जाईल. मुंबई ते शिर्डी CC साठी 800 रुपये आणि EC साठी 1630 रुपये मोजावे लागणार असून केटरिंग सेवेसाठी स्वतंत्र शुल्क आकारण्यात येणार आहे.
वंदे भारत ट्रेन म्हणजे आरामच आराम..
जर आपण या ट्रेनमधील आरामाबद्दल बोललो, तर सध्या भारतीय रेल्वेमध्ये धावणाऱ्या सर्व गाड्यांपैकी या ट्रेनला सर्वात कमी धक्के बसतात. विशेषत: जेव्हा गाडी घाटातून जाईल तेव्हा प्रवाशांना विमान प्रवासाचा अनुभव मिळतो. या ट्रेनमध्ये सुरक्षेसाठी स्वदेशी बनावटीची ‘KAWACH’ यंत्रणा बसवण्यात आली आहे. समोरून येणाऱ्या दोन गाड्यांची टक्कर टाळण्यासाठी ही यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. याशिवाय आरामदायी बसण्यासाठी सीट्स 180 डिग्री पर्यंत फिरतात.
प्रवाशांना माहिती देण्यासाठी प्रत्येक कोचमध्ये 32 (इंच) स्क्रीन असणार आहे. या ट्रेनमध्ये विमानाच्या धर्तीवर आधुनिक पॅन्ट्री आणि स्वच्छतागृहे आहेत. 16 डब्यांच्या वातानुकूलित वंदे भारत ट्रेनला दोन एक्झिक्युटिव्ह क्लासचे डबे आहेत. संपूर्ण ट्रेनमध्ये 1128 प्रवाशांची आसन व्यवस्था आहे.
या स्टेशन्सवर असणार थांबा, नावे पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा
साईनगर शिर्डीसाठी मिळणार शुद्ध शाकाहारी जेवण..
या गाड्यांसाठी केटरिंग मेनू आयआरसीटीसी (IRCTC) तयार करत आहे. अंतिम निर्णय मंडळाच्या सूचनेनंतरच घेतला जाईल. मध्य रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, यावर्षी सरकारने भरड धान्यांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे, त्याची झलक वंदे भारतच्या मेनूमध्येही पाहायला मिळेल.
शिर्डीला जाणाऱ्या ट्रेनमध्ये फक्त शाकाहारी जेवण दिले जाईल. त्यात नाचणीचे पदार्थ दिले जाणार आहेत. सोलापूरला जाणाऱ्या ट्रेनमध्ये मांसाहार दिला जाणार आहे. सकाळी कोणत्याही स्थानकातून सुटणाऱ्या गाड्यांमध्ये नाश्ता आणि चहा दिला जाईल, तर संध्याकाळी सुटणाऱ्या गाड्यांमध्ये चहा आणि रात्रीचे जेवण दिले जाईल. केटरिंग चार्जसाठी प्रवाशांना सुमारे 250 रुपये मोजावे लागणार आहे.
वंदे भारत ट्रेनचे टाइम टेबल..
CSMT : सकाळी 6.15 (प्रस्थान)
साई नगर शिर्डी : दुपारी 12.10 (आगमन)
साई नगर शिर्डी : सायंकाळी 5.25 (प्रस्थान)
CSMT : 11.18 pm (आगमन)
सोलापूर : सकाळी 6.05 (प्रस्थान)
पुणे : सकाळी 9 (आगमन)
CSMT : दुपारी 12.35 (आगमन)
CSMT : 4.10 pm (प्रस्थान)
पुणे : संध्याकाळी 7.10 (आगमन)
सोलापूर : रात्री 10.40 (आगमन)