Vande Bharat Trains: मुंबई ते शिर्डी 5 तासांत तर मुंबई ते सोलापूर 6 तासांत ! ‘या’ दिवशी मोदी दाखवणार हिरवा झेंडा, पहा दोन्ही रुटवरील स्टेशन्स..
देशभरात आत्तापर्यंत सुमारे अर्धा डझन वंदे भारत गाड्या धावल्या आहेत, पण यावेळी मात्र वंदे भारतची खरी कसोटी लागणार आहे. जिथे सामान्य गाड्यांनाही पुढील आणि मागील इंजिनांचा वापर करावा लागतो अशा महाराष्ट्रातल्या एका अवघड घाटात देशातील पहिली सेमी – हायस्पीड ट्रेन कशी धावणार याबाबत उत्सुकता होती. गेल्या दोन दिवसांपासून त्याची चाचणी मध्य रेल्वेच्या घाट विभागात सुरू असून त्याचा परिणाम समोर आला आहे.
यातून से दिसून आले आहे की वंदे भारत कोणत्याही इंजिनच्या मदतीशिवाय घाट चढू आणि उतरू शकते. 10 फेब्रुवारीला वंदे भारत गाड्या सीएसएमटीहून शिर्डी आणि सोलापूरसाठी धावणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना हिरवा झेंडा दाखवणार आहे.
वंदे भारत छत्रपती शिवाजी टर्मिनस ते शिर्डी हा प्रवास 5 तासांत पूर्ण करेल. या वंदे भारत ट्रेनला दादर, ठाणे आणि नाशिक रोडवर थांबे देण्यात येणार आहेत. भविष्यात यामध्ये आणखी थांबे जोडले जाणार असून तशी मागणीही पुढे आली आहे.
तसेच छत्रपती शिवाजी टर्मिनस ते सोलापूर दरम्यानचा वंदे भारत हा प्रवास साडे सहा तासांत पूर्ण होणार आहे. दादर, ठाणे, लोणावळा, पुणे आणि कुर्डुवाडी येथे या ट्रेनचे थांबे असणार आहे. 160 किमी प्रतितास क्षमतेच्या वंदे भारतचा मुंबई – शिर्डी दरम्यान सरासरी वेग 60 किमी प्रतितास असेल. तर मुंबई ते सोलापूर दरम्यान या ट्रेनचा सरासरी वेग सुमारे 70 किमी प्रतितास असणार आहे.
भोर आणि थळ घाटात यशस्वी दौड..
महाराष्ट्रात मध्य रेल्वेचे दोन सर्वात कठीण घाट विभाग आहेत. एक पुण्याला जोडणारा भोर घाट आणि दुसरा नाशिकला जोडणारा थळ घाट. येथिल ट्रॅक प्रत्येक 37 मीटरनंतर 1 मीटरने उंची वाढते. भोर घाट सुमारे 28 किमी लांब आहे आणि थळ घाट 14 किमी लांब आहे. या घाट विभागात अनेक बोगदे आणि पूल आहेत. या भागात पावसाळ्यात दरड कोसळण्याचे प्रमाणही अधिक आहे. अशा या आव्हानात्मक मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेसची यशस्वी चाचणी पूर्ण झाली आहे.
वंदे भारताला ‘आधार’ ची गरज नाही..
भोर आणि थळ घाटांसारखे अवघड घाट देशातील इतर कोणत्याही रेल्वे नेटवर्कवर आढळत नाहीत. मध्य रेल्वेचे हे दोनच घाट असे आहेत जिथे पॅसेंजर गाड्या चालतात पण सपोर्ट सिस्टीमसह.. कर्जत आणि कसारा येथे गाड्यांच्या मागे दुसरे इंजिन जोडले जाते, जे ट्रेनला मागूनही ढकलते. वंदे भारतमध्ये पार्किंग ब्रेक यंत्रणा आहे. आपण सहसा कारमध्ये अशी एक सिस्टीम पहिली असेल जी वाहनाला उतारावरून खाली येण्यापासून प्रतिबंधित करते. या सिस्टीममुळे वंदे भारत घाटाची कसोटी यशस्वीपणे पार पडली आहे. तसे, 16 डब्यांच्या वंदे भारतचे वजन देखील इतर गाड्यांच्या तुलनेत कमी आहे आणि यामुळे संतुलन राखण्यासही मदत होते.
फक्त आणखी हे एक आव्हान बाकी..
वंदे भारतने घाटातली परीक्षा उत्तीर्ण केली असली तरी भविष्यात आणखी एका आव्हानाला सामोरे जावे लागेल. देशातील पहिली वंदे भारत ट्रेन दिल्लीहून बनारसला निघाली तेव्हा परतत असताना म्हशीला धडकली. अलिकडेच पश्चिम रेल्वेवर धावणाऱ्या वंदे भारत या गाडीला तब्बल पाच वेळा गुरांची धडक बसली आहे. या आव्हानांपासून सेमी – स्पीड गाड्यांना वाचवण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या संपूर्ण ट्रॅकच्या दोन्ही बाजूला फेन्सिंग बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अशी आव्हाने मध्य रेल्वेवरही येणार आहेत. याठिकाणी लोकल ट्रेनला गुरे धडकल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. असे काही अडथळे असल्यास कुंपण घालण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याचं असं एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं आहे.