Take a fresh look at your lifestyle.

Pune Ring Road : पुणे रिंगरोडच्या खरेदीखतांना सुरुवात, फक्त 3 हेक्टर भूसंपादनासाठी तब्बल 14 कोटींच्या धनादेशाचे वाटप..

0

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) हाती घेण्यात आलेल्या वर्तुळाकार रस्ता (रिंगरोड) प्रकल्पाला गती मिळाली आहे. त्यानुसार प्रत्यक्ष खरेदीखतांना सुरुवात झाली आहे. (Pune Ring Road)

या प्रकल्पासाठी संमती करारनाम्याद्वारे जमिनी दिलेल्या 14 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या मोबदल्याचे सुमारे 13 कोटी 82 लाख 90 हजार रुपयांचे धनादेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) अधीक्षक अभियंता राहुल वसईकर आणि अपर जिल्हाधिकारी हनुमंत अरगुडे, भूसंपादन (समन्वय) उपजिल्हाधिकारी प्रवीण साळुंखे, एमएसआरडीसीचे कार्यकारी अभियंता अजित पाटील आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, आजचा दिवस पुणे जिल्ह्यासह राज्यासाठी महत्त्वाचा आहे. एक प्रकारे खऱ्या अर्थाने या प्रकल्पाच्या अंमलबजावणीला आज सुरुवात झाली आहे. हा प्रकल्प राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे.

पुण्यामध्ये वाहतूक कोंडीचा सर्वांनाच त्रास होती. त्यावर मात करण्यासाठी हा प्रकल्प अतिशय महत्त्वाचा आहे. कोविड काळातही या प्रकल्पासाठी सर्वेक्षण, जमीन मोजणी आदी प्रक्रियेत राज्य रस्ते विकास महामंडळ, महसूल विभाग, भूमी अभिलेख व मूल्यनिर्धारण विभागांनी अतिशय सक्षमपणे काम केले आहे.

पैशांचे योग्य नियोजनाच्या सूचना..

भूसंपादनातून मिळालेल्या पैशाचे योग्य नियोजन करण्याचा सल्लाही जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी शेतकऱ्यांना दिला. मोठ्याप्रमाणात मिळालेल्या रकमेचा भविष्यासाठी चांगल्या प्रकारे उपयोग करा, शाश्वत गुंतवणूक करा, अनावश्यक बाबींवर खर्च करू नका, असेही देशमुख यांनी सांगितले.

रकमेच्या गुंतवणुकीसाठी चांगल्या पर्यायांची माहिती खातेदारांना होण्यासाठी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापकांच्या माध्यमातून मार्गदर्शन शिबिर आयोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.

एकाच कुटुंबातील नऊ शेतकऱ्यांना मोबदला प्रदान..

पुणे (पश्चिम) रिंगरोडसाठी हवेली तालुक्यातील कल्याण गावातील एकाच कुटुंबातील नऊ शेतकरी, मावळ तालुक्यातील ऊर्से गावातील दोन शेतकरी, पाचाणे गावातील शेतजमिनीचा मोबदल्याचा धनादेश, मुळशी तालुक्यातील घोटावडे गावातील दोन शेतकरी, असे एकूण सुमारे 3 हेक्टर 17 आर संपादित क्षेत्रासाठी 13 कोटी 82 लाख 90 हजार रुपयांचे धनादेश शेतकऱ्यांना देण्यात आले.

शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त..

दरम्यान, भूसंपादन नोटीस प्राप्त झाल्यानंतर स्वत:हून जमीन देणाऱ्यांना मोबदल्याची 25 टक्के रक्कम अधिक देण्यात येईल, असे नमूद करण्यात आलं होतं.

त्यानुसार, रिंग रोडच्या संदर्भात अतिशय चांगला, आम्ही अपेक्षाही केली नव्हती इतका मोबदला मिळाला आहे. आम्ही स्वत:हून सहमती दिल्यामुळे 25 टक्के अधिक मोबदला मिळाला आहे अशी माहिती शेतकरी मिलिंद अण्णासाहेब शेलार, मौजे ऊर्से (ता. मावळ) यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.