Pune Ring Road : रिंगरोड’बाधित शेतकरी मालामाल ! अवघ्या 20 दिवसांत 275 प्रकल्पग्रस्तांना 250 कोटींचे वाटप..
राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) हाती घेतलेल्या वर्तुळाकार रस्त्याच्या (रिंगरोड) भूसंपादनाला गती मिळाली आहे त्यानुसार अवघ्या 20 दिवसांमध्ये पश्चिम भागातील मार्गिकेसाठी 125 एकर भूसंपादन करण्यात आले असून, 275 प्रकल्प ग्रस्तांना 250 कोटी रुपयांचा मोबदला वाटप करण्यात आला आहे. दरम्यान, भूसंपादनासाठी राज्य सरकारकडून एक हजार कोटी रुपयांचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयास उपलब्ध करून देण्यात आला आहे. (Pune Ring Road)
तर, नोटिसा बजाविण्यात आलेल्या बाधितांना नोटीस मिळाल्यानंतर, 30 जुलैपर्यंत संमतिपत्र सादर करण्याची मुदत देण्यात आली असताना या मुदतीत 21 ऑगस्टपर्यंत जिल्हा प्रशासनाकडून वाढ देण्यात आली आहे.
पुणे आणि पिंपरी – चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रस्ते महामंडळाने 172 किलोमीटर लांबी आणि 110 मीटर रुंदीच्या रिंगरोडचे काम हाती घेण्यात आले आहे. या रस्त्याच्या कामाची सर्व प्रक्रिया यापूर्वीच पूर्ण झाली असून भूसंपादनाचे काम थांबले होते. मात्र, गेल्या महिन्यात पाच जुलैपासून पश्चिम भागातील मागांच्या भूसंपादनासाठी जिल्हा प्रशासनाकडून बाधितांना नोटिसा देण्यास सुरुवात करण्यात आली.
अवघ्या 20 दिवसांत 125 एकर जागेचे भूसंपादन करण्यात आले आहे. भूसंपादनाची कामे वेगात सुरू झाली असून आणखी गती मिळणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली.
जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, बाधितांना नोटीस प्राप्त झाल्यानंतर, 30 जुलैपर्यंत संमतीपत्र सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मुदतीत संमतीपत्र देणाऱ्यांना 25 % अधिक मोबदला देण्यात येणार आहे. दरम्यान, ही मुदत वाढविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला असून, 21 ऑगस्टपर्यंत ही संमतीपत्र बाधितांना सादर करावे.
रिंगरोडचे पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग करण्यात आले आहेत. पूर्व भागात मावळातील 11, खेडमधील 12, हवेलीतील 15, पुरंदरमधील पाच आणि भोरमधील तीन गावांचा समावेश आहे, तर पश्चिम भागात भोरमधील 5, हवेलीतील 11 , मुळशीतील 15 आणि मावळातील 6 गावांचा समावेश आहेत.
प्रकल्पासाठी 695 हेक्टर जमिनीचे संपादन करावे लागणार आहे. त्यानुसार जमिनींच्या मूल्यांकनाची प्रक्रिया यापूर्वीच पार पडली आहे. ती प्रक्रिया करताना शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, म्हणून भूसंपादन करण्यात येणान्या प्रत्येक जमीननिहाय स्वतंत्र मूल्यांकन निश्चित करण्यात आले आहे.
पश्चिम भागातील रिंगरोडच्या भूसंपादनाची प्रक्रिया गेल्या महिन्यापासून सुरू झाली आहे. आतापर्यंत 125 एकर जागा ताब्यात आली असून, पूर्वेकडील गावांची देखील फेरमूल्यांकन प्रक्रिया पार पडली आहे. याबाबतचा अहवाल नगर विकास विभागातील सचिवांकडे पाठविण्यात आला असून, अंतिम होताच पूर्वकडील गावांचे देखील भूसंपादन तातडीने करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली आहे.