Monsoon News : ‘या’ तारखेला राज्यात मान्सूनचं आगमन होणार..! हवामान तज्ज्ञ पंजाब डख यांनी थेट तारीखच सांगितली..
मार्च महिन्यात आणि एप्रिलच्या सुरुवातीस, महाराष्ट्रात अवकाळीमुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. त्यामुळे दोन्ही महिन्यात तापमान सामान्यपेक्षा कमी नोंदवले गेले. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात लोकांना थंडी जाणवत होती. मात्र, 10 एप्रिलपासून तापमानात वाढ झाल्याने उकाडा जाणवू लागला आहे. आता काही दिवसांनी मान्सूनच्या पावसाची प्रतीक्षा सुरू होणार असून मात्र यंदा मान्सूनचा पाऊस कमी होण्याची भीती व्यक्त होत आहे.
अशातच आता शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी दिली आहे. 20 ते 22 मे किंवा त्या आधी मान्सून अंदमान निकोबारात दाखल होणार असून राज्यात यंदा 8 जूनला मान्सूनचे आगमन होणार आहे. यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात 22 जूनपर्यंत मान्सूनचा पाऊस येणार असल्याचा अंदाज डख यांनी व्यक्त केला आहे.
संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी डख म्हणाले की, गेल्या तीन ते चार दिवसांपासून तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आणखी चार ते पाच दिवस तापमान वाढलेले राहणार आहे. सुमारे 45 अंश सेल्सिअसपर्यंत तापमानाचा पोहचणार आहे.हवामानामध्ये प्रचंड उकाडा वाढणार असल्याचे डख यावेळी म्हणाले.
या महिन्यात पुन्हा एकदा 11 ते 16 मे दरम्यान राज्यात हवामान कोरडे राहणार आहे. 17 मे नंतर राज्यात पुन्हा एकदा पाऊस पडेल. यामुळे शेतकऱ्यांनी शेतीची कामे 16 मे पर्यंत पूर्ण करून घ्यावी, असे डख यांनी शेतकऱ्यांना सांगितले.
मान्सूनचा पाऊस 8 जूनला महाराष्ट्रात दाखल होणार आहे. 22 जूनपर्यंत तो संपूर्ण महाराष्ट्रात पडणार आहे. यानंतर 26 व 27 जूनला शेतकरी बांधवांनी खरिपाच्या पेरण्या कराव्या.
जुनपेक्षा जुलै महिन्यात जास्त पाऊस पडणार आहे. त्यानंतर ऑगस्ट सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये सुद्धा चांगला पाऊस पडणार असल्याचा अंदाज डख यांनी वर्तविला आहे.