बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्रीवादळात रूपांतर झाले आहे. या चक्रीवादळाला ‘मँडोस’ असे नाव देण्यात आले आहे. या चक्रीवादळाचा फटका महाराष्ट्रालाही बसणार असून कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही भागांत मेघगर्जनेसह पाऊस पडणार आहे, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
दरम्यान, राज्यात किमान तापमानात घट झाली असून, शुक्रवार, 9 डिसेंबर रोजी सर्वात कमी तापमान औरंगाबादमध्ये 7.9 अंश सेल्सिअस इतके नीचांकी नोंदवले गेले. ‘मँडोस’ चक्रीवादळाच्या संकटाचा सवात जास्त फटका दक्षिणेकडील राज्यांना बसणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
पुद्दुचेरी, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये हाय अलर्ट जारी केला आहे. चक्रीवादळामुळे या राज्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 11 ते 15 डिसेंबरदरम्यान महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातच्या बहुतांश भागात पावसाची शक्यता आहे. राज्यात 11 व 12 डिसेंबरला मराठवाड्यातील उस्मानाबाद, बीड, लातूर, तर पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा अहमदनगर, कोल्हापूर आणि कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे .
तर 12 व 13 डिसेंबरला कोकण व मध्य महाराष्ट्रात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा आहे. दक्षिण कोकणात व गोवा किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहणार आहे. तर विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
राज्यात 10 ते 13 डिसेंबरदरम्यान पावसाचा इशारा आहे. या चक्रीवादळामुळ राज्यातील बहुतांश भागात ढगाळ वातावरण राहणार. असून, तापमानदेखील वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, शुक्रवार, ९ डिसेंबर रोजी उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याला असणारा अडथळा कमी होऊ लागल्याने राज्याच्या काही भागांत थंडी परतू लागली आहे. तर किमान तापमानाबरोबर कमाल तापमानातही घट झाली आहे.
औरंगाबाद, पुणे, नागपूर, गोंदिया, नांदेडमध्ये नीचांकी तापमान आहे. राज्यात सर्वात कमी तापमान औरंगाबादमध्ये 7.9 अंश सेल्सिअस इतके नोंदवले आहे. तर सर्वांत जास्त कमाल तापमानाची नोंद सांगलीमध्ये 34.2 अंश सेल्सिअस इतकी झाली आहे.