राज्यात 23 हजार 628 पोलिसांची पदभरती करण्यात आली आहे. पूर्वी भरती प्रशिक्षणाची क्षमता ही 8 हजार 400 एवढी होती. आता पोलीस भरतीच्या क्षमतेत वाढ करण्यात आली आहे नव्या आकृतिबंधानुसार दोन पोलीस स्टेशनमध्ये किती अंतर असावे, किती कर्मचारी असावे, याबाबत अभ्यास करण्यात आला आहे. अशी माहिती बुधवारी विधान परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पोलीस भरतीमध्ये कंत्राटी भरती मुळीच नाही. दोन वर्षे भरती झाली नाही. महाराष्ट्र पोलीस सुरक्षा महामंडळाचे कर्मचारी भरतीमध्ये घ्यायचे झाल्यास त्यांचा पगार कोण देणार याबाबत जीआर काढण्यात आला आहे. नवीन पोलीस भरती घेण्यात येणार नसली तरी पहिले जाहिरात काढू व नंतर परीक्षा घेण्यात येईल, याबाबत पोलीस महासंचालकांसोबत चचा करण्यात येईल.
भरतीबाबत चांगल्या एजन्सीची नियुक्ती करण्यात आली आहे नवीन सायबर प्लॅटफार्म तयार करण्यात येणार आहे. सायबर जगताचे तंत्रज्ञान रोज बदलत आहे. त्यामुळे सायबर गुन्हे वाढले असून याविरुद्ध ठोस पावले उचलण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. सीसीटीव्ही फुटेजसंदर्भात नवीन नार्मस तयार करता येईल काय, याबाबत गृहविभागाला सूचना केली जाईल.
राज्य शासनाच्या गृहविभागात सध्या 52,822 पोलीस शिपाई पदे रिक्त आहेत. त्यामुळे पोलीस शिपाई भरती तातडीने करावी, अशी अनेक उमेदवारांची मागणी आहे, असा प्रश्न आमदार सतेज पाटील, भाई जगताप, अभिजित वंजारी, राजेश राठोड, जयंत आसगावकर, धीरज लिंगाडे, डॉ. प्रज्ञा सातव, डॉ. वजाहत मिर्झा व सुधाकर अडबाले यांनी लक्षवेधीद्वारे प्रश्न उपस्थित केला असता उपमुख्यमंत्री फडणवीस उत्तर देताना बोलत होते.
पोलीस भरतीसाठी उमेदवार मोठ्या प्रमाणात सराव करीत आहेत. कोरोनाकाव्यत अनेक उमेदवारांची वयोमर्यादा संपत असल्याने उमेदवार निराश झाले असून मार्च 2023 मध्ये सामान्य प्रशासन विभागामार्फत दोन वर्षे कमाल वयोमर्यादा वाढवून देण्यात आली. त्यानुसार 31 डिसेंबर 2023 पूर्वी पोलीस भरती जाहिरात काढून पदे भरून घेतल्यास लाखो उमेदवार पोलीस भरतीस पात्र होतील. त्यामुळे शासनाने तातडीने पोलीस भरतीचा निर्णय घ्यावा, अशी मागणी सदस्यांनी केली.
1 हजार तज्ज्ञ लोकांचा ई – फोर्स..
सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी राज्यात पोलीस दलातील 1 हजार तज्ज्ञ आणि हुशार लोकांची (ई – फोर्स) फौज तयार करण्यात येणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी राज्यात सायबरची संपूर्ण यंत्रणा तयार करण्यात येत आहे. 1 हजार तरुण पोलिसांना प्रशिक्षण देऊन सायबर गुन्ह्यांच्या विरोधात ठोस पावले उचलली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
राज्यात तयार करण्यात येणारे सायबर प्लॅटफॉर्म हे जगात सर्वात डायनॅमिक राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. प्रशिक्षित लोकांचे फोर्स तयार करीत आहोत. पोलीस दलाला अधिक सक्षम करण्यासाठी नवीन आकृतिबंध तयार करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.