पशूसंवर्धन विभागात विविध 446 पदांसाठी भरतीची प्रक्रिया राबविली जात असल्याची माहिती राज्याचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. या विभागात सर्वात मोठी भरती जाहीर करून मंत्री विखे पाटील यांनी जनतेला दिलेला शब्द खरा ठरविला आहे.
लम्पी संसर्गाच्या वेळी पशूसंवर्धन विभागात पदांची कमतरता लक्षात घेता, त्यावेळी पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लवकरच आवश्यक त्या पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे आश्वासन जनतेला दिले होते.
त्यानुसार त्यांनी याबाबत धोरणात्मक निर्णय घेत ही बहुप्रतिक्षित पदभरती जाहीर केली आहे . स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली राज्यात मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया राबविली जात आहे . याच अंतर्गत पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून सरळसेवा कोट्यातील रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात काढण्यात आली आहे.
पदाचे नाव | जागा | वेतन श्रेणी (रु.) |
पशुधन पर्यवेक्षक | ३७६ जागा | २५,०००-८१,१०० |
लिपिक (वरिष्ठ) | ४४ जागा | २५,५००-८१,१०० |
तांत्रिकी | ०२ जागा | १९,९००-६३,२०० |
तारतंत्री | ०३ जागा | १९,९००-६३,२०० |
प्रयोगशाळा तंत्रज्ञ | ०४ जागा | ३५,४००-१,१२,४०० |
लघुलेखक (उच्च श्रेणी) | ०२ जागा | ४१,८००-१,३२,३०० |
लघुलेखक (निम्न श्रेणी) | १३ जागा | ३८,६००-१,२२,८०० |
बाष्पक परिचर | ०२ जागा | १९,९००-६३,२०० |
यामध्ये पशुधन पर्यवेक्षकची 367 पदे , वरिष्ठ लिपीकची 44 पदे, लघुलेखकाची (उच्चश्रेणी) 2 पदे, लघुलेखक (निम्नश्रेणी) 13 पदे, प्रयोगशाळा तंत्रज्ञची 4 पदे, तारतंत्रीची 3 पदे, यांत्रिकीची 2 पदे , बाष्पक परिचरची 2 पदे अशी एकूण 446 पदे भरली जाणार आहेत.
यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले आहे. 27 मे 2023 रोजी सकाळी 10 वाजेपासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक 11 जून 2023 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत आहे.
परीक्षा येत्या जुलै महिन्यात होणार असल्याचे सांगितले आहे.