Ring road : PMRDA चं ठरलं ! 128Km अंतरात 17 उड्डाणपूल, 5 बोगदे, भूसंपादनासाठी 5,800 कोटींचा खर्च, पहिल्या टप्प्यात ‘या’ गावांत होणार भूसंपादन..
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (PMRDA) हाती घेतलेल्या वर्तुळाकार रस्त्याचा (Ring Road) सर्वंकष प्रकल्प अहवाल अंतिम टप्प्यात आहे. 65 मीटर रुदींच्या या रस्त्यावर छोटे आणि मोठे मिळून एकूण 15 उड्डाणपूल, दोन रेल्वे मार्गावरील उड्डाणपूल, पाच बोगदे प्रस्तावित करण्यात आले आहेत.
त्यानुसार पहिल्या टप्प्यात सोलू, निरगुडे ते वडगाव शिंदे यादरम्यान पाच किलोमीटराच्या वर्तुळाकार रस्त्याच्या जागेच्या भूसंपादनासाठीचे प्रस्ताव पीएमआरडीएकडून जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आले आहेत.
पीएमआरडीएने प्रादेशिक विकास आराखड्यातील रिंगरोड विकसित करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला. एकूण 128 किलोमीटर लांबीचा हा वर्तुळाकार रस्ता होता. पहिल्या टप्प्यात तो 90 मीटर रुंदीचा होता; परंतु मध्यंतरी MSRDC च्या वर्तुळाकार रस्त्याप्रमाणेच तो 110 मीटर रुंदीचा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
हा रिंगरोड 1987 च्या प्रादेशिक आराखड्यातील आहे. दरम्यान, या रस्त्यावर अनेक ठिकाणी बांधकामांना परवानगी देण्यात आली आहे, त्यामुळे भूसंपादन करताना अनेक अडचणी येणार असून, खर्च देखील वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय या वर्तुळाकार रस्त्याला मोठा विरोध होत आहे. वर्तुळाकार रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यास सरकार तयार नाही.
तसेच, या रिंगरोडपासून 15 किलोमीटर अंतरावरूनच MSRDC चा सुमारे 110 मीटर रुंदीचा हा रस्ता जाणार आहे. त्यामुळे एवढ्या कमी अंतरावरून जाणारे हे दोन्ही रस्ते एकाच रुंदीचे करणे योग्य होणार नाही. त्यामुळे रस्त्याची रुंदी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यानुसार 65 मीटर रुंदीचा रस्ता करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यानुसार नव्याने वर्तुळाकार रस्त्याचा प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी पीएमआरडीएकडून सल्लागार कंपनीची नियुक्ती करण्यात आली होती. या कंपनीकडून वर्तुळाकार रस्ता सर्वेक्षण पूर्ण करून अहवाल तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आल्याचे PMRDA कडून सांगण्यात आले.
सुधारित खर्चाला राज्य सरकारची मान्यता..
पीएमआरडीएच्या अर्थसंकल्पाला नुकतीच मान्यता देण्यात आली. या अर्थसंकल्पाला मान्यता देताना वर्तुळाकार रस्त्याला सुधारित खर्चासही राज्य सरकारकडून मान्यता देण्यास आली. त्यानुसार सुमारे 14 हजार कोटी 200 कोटी रुपयांची मान्यता मिळाली आहे. त्यापैकी वर्तुळाकार रस्त्याच्या भूसंपादनासाठी सुमारे 5 हजार 800 कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे.
वर्तुळाकार रस्त्याच्या डीपीआरचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात सोलू ते वडगाव शिंदे यादरम्यानच्या पाच किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम हाती घेण्यात येणार असून, त्यासाठीचे भूसंपादनाचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आले आहेत. प्रकल्पाच्या सुधारित खर्चालादेखील नुकतीच मान्यता मिळाली आहे.
– रामदास जगताप, उपजिल्हाधिकारी, PMRDA
प्रस्तावित रिंगरोडच्या प्रमुख बाबींमध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे.
बांधकामाचे आठ टप्पे..
पंधरा उड्डाणपूल, दोन रेल्वे उड्डाणपूल आणि पाच बोगदे
एकूण 128 किलोमीटर लांबी, अंदाजे 88 किलोमीटरसाठी PMRDA जबाबदार आहे आणि उर्वरित 40 किलोमीटर MSRDC च्या अधिकारक्षेत्रात येतात
महापालिका त्यांच्या हद्दीतून जाणार्या 5.70 किलोमीटर लांबीच्या बांधकामावर देखरेख करणार आहे.
पहिल्या टप्प्यात सोलू ते वडगाव शिंदे दरम्यानचा पाच किलोमीटरचा पट्टा विकसित करण्यावर भर आहे. या विभागासाठी भूसंपादनाचे प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आले आहेत. या क्षेत्रासाठी भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचा मानस पीएमआरडीएने व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र राज्य सरकारने पीएमआरडीएच्या अर्थसंकल्पाला नुकत्याच दिलेल्या मंजुरीमध्ये सुमारे 14,000 कोटी रुपयांच्या रिंगरोड सुधारणा खर्चाच्या शिफारशीचाही समावेश आहे. या अर्थसंकल्पातील महत्त्वपूर्ण भाग, सुमारे 5,800 कोटी रुपये, भूसंपादनासाठी वाटप करणे अपेक्षित आहे.