शेतीशिवार टीम, 3 डिसेंबर 2021 : लवकरच राज्य मंत्रिमंडळाचा छोटा विस्तार होणार असून राज्यातील युवकांच्या मनातील लोकप्रिय नेता अशी ओळख निर्माण झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कर्जत – जामखेडचे आमदार रोहित पवारांना थेट कॅबिनेट मंत्री पदाची संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यामुळे रिकाम्या झालेल्या जागेवर राज्याचे कामगार आणि उत्पादन शुल्क दिलीप वळसे पाटील यांनी गृहमंत्री पदाची धुरा सांभाळल्याने कामगार आणि उत्पादन शुल्क हे कॅबिनेट मंत्रिपद सध्या रिकामं आहे. या जागेवर आ. रोहित पवारांची वर्णी लागू शकते.
तसेच अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद भूषवत असलेले मंत्री हसन मुश्रीफ यांनीही कोल्हापूरकडे दुर्लक्ष होत असल्याचं सांगत यापुढे पालकमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारणार नसल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्रीपदही आमदार रोहित पवार यांच्या गळ्यात पडू शकतंअशी माहिती विश्वसनिय सूत्रांनी दिली आहे.
आता यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले. रोहित पवार एक युवा आणि कार्यशील आमदार म्हणून परिचित आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिसऱ्या पिढीचे वारसदार म्हणून रोहित पवार यांच्याकडे पाहिलं जातंय.
रोहित पवार यांना मंत्रीपद अन् पालकमंत्र्यांची धुरा सांभाळायला दिली तर अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजून मजबूत होणार आहे. परंतु आता शरद पवार काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.