हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते भरवीर, ता. इगतपुरी या 80 किलोमीटर लांबीच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपाथितीत पार पडणार आहे. समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टण्याच्या लोकार्पणामुळे नागपूर ते शिर्डी केवळ 5 तासांत गाठणे शक्य होणार असून आता अजून तासाभरात तर नाशिक गाठता येणार आहे.

समृद्धी महामार्गाच्या पॅकेज क्र. 11, 12 आणि 13 चे इगतपुरी तालुक्यामधील भरवीरपर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. प्रकल्पाच्या या दुसऱ्या टप्प्याचा खर्च 3200 कोटी रुपये असून लांबी 80 किमी आहे.

या टप्प्याच्या उद्घाटनानंतर 701 किमीपैकी आता एकूण 600 किमी लांबीचा समृद्धी महामार्ग वाहतुकीस उपलब्ध होणार आहे.

या दुसऱ्या टप्प्यात सिन्नर येथील गोंद इंटरचेंज येथून नाशिक, अहमदनगर, पुणे व त्या भागातील इतर गावांसाठी या महामार्गाचा उपयोग होईल. भरवीर इंटरचेंजपासून घोटी (ता. इगतपुरी) हे अंदाजे 17 किमी अंतरावर आहे.

या इंटरचेंजपासून नाशिक, ठाणे, मुंबई येथून शिर्डी येथे जाणाऱ्या भाविकांचा प्रवास जलद होईल. तसेच भरवीर या इंटरचेंजपासून एसएमबीटी रुग्णालय अत्यंत जवळ (500 मीटर अंतरावर) आहे. शिर्डीपासून या रुग्णालयापर्यंत एक तासाच्या आत पोहोचता येईल.

याशिवाय शिर्डी, अहमदनगर व सिन्नर परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या वाहतुकीसाठी मुंबई महानगर प्रदेशात येण्यासाठी कमी कालावधी लागेल.

विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील 24 जिल्ह्यांच्या विकासासाठी गेमचेंजर ठरणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या 520 किलोमीटर लांबीच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 11 डिसेंबर 2022 रोजी पार पडले.

हा महामार्ग खुला झाल्यानंतर नागपूर ते शिर्डी अंतर 10 तासांऐवजी फक्त पाच तासांतच कापणे शक्य झाले आहे. आता भरवीर पर्यंत हा मार्ग खुला झाल्याने नागपूर वरून अवघ्या साडेपाच, सहा तासांत नाशिक गाठता येणार आहे. यामुळे मुबईलाही जलद पोहचता येणार आहे.

7 मोठे पूल, 18 छोटे पूल, वाहनांसाठी 30 भुयारी मार्ग, हलक्या वाहनांसाठी 23 भुयारी मार्ग, 3 पथकर प्लाझावरील 3 इंटरचेंज, 56 टोल बूथ, 6 वे ब्रिज आदी सुविधांचा समावेश आहे.

या टप्यात अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील एकूण 7 गावांतून लांबी 11.141 किमी नाशिक जिल्ह्यातील एकूण 68.036 किमी लांबीपैकी सिन्नर तालुक्यातील एकूण 26 गावांतून 60.969 किमी व इगतपुरी तालुक्यातील 5 गावांतील 7.067 किमी लांबीचा समावेश आहे.

त्यामध्ये पंकज – 11 अतर्गत कोकमठाण, ता. कोपरगाव, जि. अहमदनगर, पॅकेज 12 अंतर्गत गोदे, ता. सिन्नर, जि. नाशिक व पॅकेज -13 अंतर्गत एस.एम.बी.टी. मेडिकल कॉलेज, भरवीर, ता. इगतपुरी, जि. नाशिक या इंटरचेंजचा समावेश आहे.

समृद्धी महामार्गाचा तिसरा टप्पा रखडला..

समृद्धी महामार्गादरम्यान इगतपुरी – आमणे या अत्यंत आव्हानात्मक टप्प्याचे काम डिसेंबरऐवजी मार्च 2024 मध्ये पूर्ण होणार आहे. या मार्गादरम्यान 12 बोगदे असून यातील एक बोगदा आठ किमी लांबीचा आहे.

इगतपुरी आमणेदरम्यानचे काम डिसेंबर 2023 ऐवजी मार्च 2025 मध्ये पूर्ण होणार आहे. परिणामी मुंबई – शिर्डी – नागपूर प्रवासासाठी वाहनचालक – प्रवाशांना आता मार्च 2024 पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *