राजकीयदृष्ट्या संवेदनशील आष्टा शहराची ओळख विविध अंगाने होत आहे. यातच आपल्या हळदीच्या विक्रमी उत्पादनाने येथील युवा शेतकरी विश्वराज विशाल शिंदे यांनी पंचक्रोशीतील शेतकऱ्यांसमोर आदर्श ठेवून लौकिकात भर घातली आहे. विश्वराज शिंदे यांनी 114 गुंठे क्षेत्रात 114 क्विंटल हळदीचे विक्रमी उत्पादन घेऊन उच्चांक नोंदवला आहे.
गतवर्षी त्यांनी प्रति गुंठयात प्रतिक्विंटल असे हळदीचे उत्पादन घेतले होते. राजकारणाचा वारसा असला तरी विश्वराज शिंदे यांनी आपली शेतीची आवड चांगल्या पद्धतीने जोपासली आहे. शेतीनिष्ठा काय असते याचे उत्तम उदाहरण त्यांनी शेतकऱ्यासमोर ठेवले आहे.
माजी आमदार स्व. विलासराव शिंदे यांचे नातू तर, माजी उपनगराध्यक्ष, शिक्षक सेवक पतसंस्थेचे संचालक विशाल शिंदे यांचे चिरंजीव आहेत. विश्वराज शिंदे यांनी 114 गुंठे क्षेत्रात हळदीच्या सेलम जातीच्या बियाणांचा वापर करून लागण केली. वेळोवेळी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेत पाणी, खत यांचे व्यवस्थापन केले.
रासायनिक खतांचा वापर करत जिद्द, चिकाटी आणि कष्ट यांच्या बळावर त्यांनी दर्जेदार हळद पिकवली. सुरुवातीलाच सेंद्रिय खतांचाही पुरेपूर वापर शेतीत केला असल्याचे त्यांनी सांगितले.
खतांची मात्रा, मशागत यासह बी – बियाणे व उत्पादनासाठी सुमारे चार लाख रुपये खर्च झाला असल्याचेही ते बोलले.
ते म्हणाले, शिंदे घराणे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर आहे.आमचे दैवत स्व. विलासराव शिंदे यांचा आदर्श डोळ्यासमोर आहे. राजकारण समाजकारण व शैक्षणिक क्रांती बरोबर कृषी क्षेत्रात देखील एक वेगळा ठसा उमटवण्यासाठी व आवड म्हणून प्रयत्न केला तो यशस्वी झाला यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरले.
शेतात बारा ट्राली कंपोस्ट खत आणि दहा ट्राल्या शेणखत वापरले. योग्य व्यवस्थापन खतांची उपलब्धता यामुळे हळद पीक चांगले आले. या हळदीच्या प्लॉटला अनेक शेतकऱ्यांनी भेटी दिल्या. वेळोवेळी त्यांनी सुचवलेल्या सूचनांचे पालन करत त्यात बदल केला व यामुळे उच्चांकी हळद निघाली.
नव्यानेच शेतीत हळदीचे उत्पादन घेणाऱ्यांसाठी हा आदर्श आहे. यासाठी विश्वराज शिंदे यांना वडील विशाल शिंदे, आई विद्याताई शिंदे यांचे सहकार्य लाभले.