आता कडक उन्हाळा सुरु झाला आहे, आणि अश्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य देखील मोठ्या प्रमाणावर जाणवू लागले आहे. या परिस्थितीत पिण्याचे पाणी मिळणे मुश्किल असते तर मग अश्यावेळी शेतीच्या पाण्याबद्दल काय बोलावे. मात्र आज आम्ही तुम्हाला एका अशा पिकाबद्दल सांगणार आहोत, जे तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कमी पाण्यातही सहज पिकवू शकता, या पिकाला जास्त पाणी लागत नाही आणि या पिकासाठी जास्त खतांची देखील गरज भासत नाही.
शिवाय हे पीक भारतीय बाजारपेठेत जास्त किंमतीला देखील विकले जाते, या पिकाची लागवड करून तुम्ही तुमचे उत्पन्न दुप्पट करू शकता. भारतातील अनेक शेतकरी बांधव अनेक वर्षांपासून या पिकाची लागवड करत असून त्यातून चांगला नफा सुद्धा मिळवत आहेत. चला तर कोणते आहे हे पीक जाणून घेऊया..
तीळ लागवड..
तेलबिया पिकांमध्ये तीळ, ही फुल वनस्पती आहे. तीळ हे तेलपिकांमधील एक महत्वाचे पीक मानले जाते. तिळाची लागवड त्याच्या बियांसाठी केली जाते जी आपल्या दैनंदिन जीवनात अनेक प्रकारे वापरली जाते. तिळापासून खाद्यतेल काढले जाते, त्यामुळेच ते इतर सामान्य पिकांपेक्षा अधिक महत्वाचे व फायदेशीर आहे, भारतात अनेक वर्षांपासून तेल काढण्यासाठी या बियांचा वापर केला जात आहे.
तर आज या लेखात आपण 1 एकरमध्ये करावयाच्या तीळ लागवडीसाठीची संपूर्ण माहिती समजून घेणार आहोत, यामध्ये तीळ लागवड करण्यासाठी किती खर्च येतो? किती कालावधी लागतो, उत्पादन किती होईल आणि नफा किती होईल,याविषयी जाणून घेणार आहोत.
एक एकर तिळाची लागवड करण्यासाठी किती येईल खर्च ?
जर तुम्हाला एक एकरमध्ये तीळ लागवड करायची असेल आणि तुम्ही संकरित बियाणे निवडले तर तुम्हाला 1 एकरमध्ये 1.5 किलो बियाणे लागतील, जसे की वेस्टर्न कंपनीकडे तीळाच्या विविध प्रजाती आहे ज्यांची किंमत 500 ग्रॅम तिळासाठी 225 रुपये इतकी आहे. तर 1.5 किलो तिळाची किंमत 675 रुपये आहे. तिळाची पेरणी सामान्यतः शिंपडणी पद्धतीने करावी लागते. तसेच पेरणीपूर्वी शेत तयार करण्यासाठी कमीत कमी 4 हजार रुपये खर्च येईल ज्यात नांगरणी आणि रोटाव्हेटरचा खर्च समाविष्ट केला आहे.
तीळ पेरणी करण्यापूर्वी तुम्ही जे काही पीक लावले असेल, त्या पिकाचे अवशेष रोटाव्हेटर वापरून पूर्णपणे नष्ट करावे, त्यानंतर जमीन तीळ पिकासाठी योग्य बनते. यानंतर तीळ पिकासाठी रासायनिक खते व इतर खतांचा खर्च 1800 रुपये होईल, तीळावरील कीड नियंत्रणासाठी फवारणी करावी लागते ज्यासाठी 800 रुपये खर्च येतो, काढणीसाठी मजुरांची गरज भासते, ज्यासाठी तुम्हाला 2500 रुपये मोजावे लागतील. त्यामुळे 1 एकरमधील तीळ पिकासाठीचा खर्च जवळ जवळ 11 हजार रुपये इतका होतो.
एक एकर तीळ लागवडीतून किती मिळेल उत्पादन ?
उन्हाळ्यात लागवड केलेले तीळ पीक पावसात लागवड केलेल्या तिळाच्या पिकापेक्षा कमी उत्पादन देते, परंतु जर तुम्ही तीळाची पेरणी योग्य वेळी केली आणि तुमच्या पिकामध्ये योग्य वेळी अन्नद्रव्य व खतांचा वापर केला तर तुमचे पीक कीडमुक्त राहील व अशा प्रकारे तुम्ही चांगल्या पध्द्तीने तीळाची लागवड करू शकता. या गोष्टीचा अवलंब केल्याने उन्हाळ्यात तुम्ही एक एकरात लागवड केलेल्या तीळ पिकापासून ४ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळवू शकता.
तीळ लागवडीसाठी योग्य वेळ कोणती ?
तुम्ही खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामात तीळ पिकाची लागवड करू शकता, तुम्ही तीळ पीक फेब्रुवारी ते 25 मार्च या कालावधीत लावू शकता. ज्या राज्यांमध्ये मे महिन्याच्या अखेरीस मान्सून दाखल होतो, त्या राज्यांमध्ये शेतकऱ्यांनी तीळाची पेरणी फेब्रुवारी महिन्यात करावी आणि ज्या राज्यांमध्ये जून किंवा जुलैच्या सुरुवातीला मान्सून दाखल होतो, त्या राज्यांमध्ये शेतकऱ्यांनी मार्च महिन्यामध्ये तिळाची पेरणी करावी. तीळाचे पीक 80 ते 90 दिवसांत तयार होते..
एक एकर तीळ लागवडीतून किती नफा मिळेल ?
भारत सरकारने 2022 – 23 मध्ये तीळ पिकाची आधारभूत किंमत 7,830 रुपये प्रति क्विंटल ठरवली होती, परंतु मार्केटमध्ये शेतकरी बांधवांना तीळ पिकाची किंमत आधारभूत किमतीपेक्षा खूपच जास्त मिळत आहे.
जर तुम्ही 2 एकरांत तुमचे उत्पादन 8 क्विंटल झाले तर तुम्हाला सध्याच्या महाराष्ट्रातील बाजारभावाप्रमाणे प्रति क्विंटल 21 हजारांपर्यंत दर मिळत आहे. त्याप्रमाणे तुम्ही 8 क्विंटल उत्पन्नातून दीड ते दोन लाखांपर्यंत नफा मिळवू शकता..