शेतीशिवार टीम, 4 डिसेंबर 2021 : रात्रभर अवकाळी पाऊस, कडाक्याचा गारठा यामुळे राज्यातील शेतकरी आणि मेंढपाळांचे शेकडो जनावरे दगावल्याने मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. अशा राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी अतिवृष्टीमुळे दगावलेल्या एका गाईसाठी 40 हजार, बैलासाठी 30 हजार तर शेळी-मेंढीसाठी 4 हजार रूपये मदत दिली जाणार असल्याची घोषणा केली आहे.
त्यांनी काल शुक्रवारी रात्री आठच्या दरम्यान पावसाळी वातावरणात बारामतीमधील सुपे येथील जाऊन कुतवळवाडीतील नुकसानग्रस्त मेंढपाळांशी संवाद साधत त्यांना धीर दिला अन् मेंढपाळांना सरकारकडून प्रत्येकी मृत मेंढीस चार हजार रूपये प्रमाणे नुकसान भरपाई दिली जाईल, अशी ग्वाही दिली.
तसचे भविष्यात असे नुकसान टाळण्यासाठी काही उपाय-योजना करता येईल का यावर विचार-विनिमय चालू असल्याचे सुतोवाचही त्यांनी केले.
राज्यातील पुणे, नगर, सातारा, नाशिक जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे मेंढ्या दगावल्या आहेत. पुणे 2000, नगर 700, नाशिक 515, सातारा 200 मेंढ्या दगावल्या आहेत.
पुणे जिल्ह्यात जुन्नर व आंबेगाव तालुक्यात सर्वाधिक प्रत्येकी सुमारे साडेसातशे मेंढ्या दगावल्याची नोंद आहे. गारठा असल्याने मृत मेंढ्यांचा आकडा आणखी वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच याबाबत पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून लवकरच मदत मिळेल असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच यावर कायम स्वरूपी काय करता येईल यासाठी तज्ञांकडून अभिप्राय मागवून उपाय योजना करण्याच्या विचाराधीन असल्याचेही सुतोवाच त्यांनी केलं आहे.