उच्च प्रतीचा कापूस उत्पादित करण्यामध्ये राज्यात विदर्भाचा पहिला क्रमांक आहे. महाराष्ट्रात उत्पादित होणाऱ्या एकूण कापसापैकी 78% वाटा हा एकट्या विदर्भाचा आहे. याचबरोबर महाराष्ट्रातील मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये देखील कापसाची लागवड केली जाते.
विदर्भातील या कापूस उत्पादक पट्ट्यामध्ये शेतकऱ्यांनी सामूहिकरीत्या एकाच कापसाच्या वाणाची लागवड करावी, जेणेकरून कापसाला निर्यातक्षम करण्यास मदत होईल तसेच मोठ्या प्रमाणावर आर्थिक लाभ देखील होईल. यासाठी राज्यातील 12 जिल्ह्यांमध्ये ‘स्मार्ट कॉटन प्रकल्प’ राबवण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांची आर्थिक वृद्धी होणार आहे.
राज्यातील 12 जिल्ह्यांमधील 35 तालुक्यांत ‘स्मार्ट कॉटन प्रकल्प’ सुरू करण्यात आला आहे. हे सर्व काम स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांतर्गत करण्यात येणार आहे. स्मार्ट कॉटन प्रकल्पासाठी ‘एक गाव, एक वाण’ हे ब्रीदवाक्य घोषित करण्यात आले आहे
सध्या विदर्भात वर्धा जिल्ह्यातील देवळी, कारंजा आणि आष्टी या तीन तालुक्यांतील 45 गावांमध्ये हा प्रकल्प राबविला जात आहे. देवळी तालुक्यासाठी संत गजानन माउली जिनिंग प्रेसिंग फुलगाव, कारंजा तालुक्यासाठी विदर्भ कोट फायर तर आष्टी तालुक्यासाठी एम.आर. जिनिंग तळेगाव यांची या प्रकल्पाकरिता निवड करण्यात आली आहे. स्मार्ट कॉटन प्रकल्पामध्ये सहभागी असलेल्या गावांमध्ये शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदवून एकजिनसी कापसाची लागवड केली आहे. यामध्ये शेतकरी बचत गटांचा देखील समावेश आहे.
या प्रकल्पामध्ये एकूण बारा जिल्ह्यांचा समावेश होणार आहे.
एकूण जिल्हे – 12
एकूण तालुके- 35
एकूण शेतकरी – 3875
एकूण गट – 478
जिल्हानिहाय तालुके पुढीलप्रमाणे असतील..
नागपूर :- सावनेर, हिंगणा, नरखेड, काटोल
वर्धा :- देवळी, कारंजा, आष्टी
यवतमाळ :- कळंब, पुसद, आर्णी, यवतमाळ,
अमरावती :- अमरावती, वरुड, अचलपूर, दर्यापूर
अकोला :- अकोला, आकोट, बोरगाव मंजू
वाशिम :- कारंजा लाड
बुलढाणा :- देऊळगाव राजा, जळगाव, जामोद
चंद्रपूर :- वरोरा, भद्रावती, गोंडपिपरी, चिमूर
परभणी :- गंगाखेड, पाथरी
बीड :- बीड, गेवराई
औरंगाबाद :- फुलउमरी, सिल्लोड, पैठण, गंगापूर
जळगाव :- धरणगाव, पालोरा