Take a fresh look at your lifestyle.

जेवढा रिचार्ज, तेवढीच वीज! या जिल्ह्यात 3 लाख स्मार्ट मीटर बसवण्यास कार्यारंभ आदेश, नव्या मीटरमुळे नेमकं काय बदलणार ?

0

महाराष्ट्रात स्मार्ट मीटर बसवण्याला प्रचंड विरोध सुरू असताना महावितरणने मीटर बसविण्याची गती वाढवली आहे. विदर्भाबाबत एकूण 52 लाख 6 हजार 982 स्मार्ट मीटर बसविले जाणार असून गोंदिया जिल्ह्यात 2 लाख 98 हजार 374 स्मार्ट प्री – पेड मीटर बसविण्यात येणार आहेत. महावितरणने राज्यात स्मार्ट प्री – पेड वीज मीटर बसविण्याची गती वाढविली असून या कामासाठी नेमलेल्या एजन्सीला कायरिंभ आदेश देण्यात आला आहे.

आता करार करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून साधारणतः फेब्रुवारी 2024 पासून मीटर बसविण्याचे काम सुरू होणार आहे. मीटर लागल्यानंतर जेवढा रिचार्ज तेवढीच वीज ग्राहकांना वापरता येणार आहे.

थकबाकी वसुलीसाठी वीज अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्यात मोठी कसरत करावी लागत. नव्या मीटरमुळे त्यांची या तणावातून मुक्तता होईल आणि तांत्रिक कामांवर अधिक लक्ष देऊ शकतील, अशी भावना महावितरणच्या वर्तुळात उमटत आहे.

महाराष्ट्रात 26 हजार कोटी रुपये खर्चून स्मार्ट मीटर बसविण्यात येणार असून प्रत्येक मीटर बदलले जाणार आहे.

जिल्ह्यातदेखील कामाची प्रक्रिया सुरू झाली आहे एकट्या गोंदिया जिल्ह्यात 2 लाख 98 हजार 374 मीटर बसविण्यात येणार आहेत. मोबाइलप्रमाणेच यात पोस्ट पेड आणि प्री – पेडची सुविधा देण्यात येणार आहे. हे संपूर्ण काम कंत्राटदार कंपनीकडून करण्यात येणार आहे.

ज्या कंपनीची मीटर बसविण्याकरिता निवड करण्यात आली त्या कंपनीला जिल्ह्यात मीटर बसविण्यासाठी 27 महिन्यांचा कालावधी लागणार आहे. या कंपनीकडे 93 महिन्यांच्या देखभाल दुरुस्तीचीही जबाबदारी असणार आहे. हे मीटर बसवून ट्रान्सफॉर्मर आणि सबस्टेशनही स्मार्ट करण्यात येणार आहे. मात्र स्मार्ट मीटर बसविण्याकरिता कंपनीलादेखील स्मार्ट व्हावे लागणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. लवकरच डेटा सेंटर आणि जीपीएस यंत्रणा विकसित करण्याची महत्त्वाची, जबाबदारी त्यांच्याकडे आहे .

जुन्या मीटरबाबत अद्याप निर्णय नाही. 

घरांमध्ये बसविलेल्या जुन्या मीटरचे काय होणार, याबाबत महावितरणने अद्याप निर्णय घेतलेला नाही. मात्र नवीन मीटर बसविण्यासाठी ग्राहकांकडून पैसे घेणार नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. या मीटरमुळे ग्राहकांना त्यांच्या इच्छेनुसार वीज वापरण्याचा अधिकार मिळणार असल्याचे महावितरण विभागाकडून सांगण्यात आले आहे. ग्राहकांना मोबाइलच्या रिचार्जप्रमाणे पैसे देऊन वीज वापरता येणार आहे.

प्री – पेड स्मार्ट मीटरमध्ये ग्राहकांचे पैसे संपताच वीजपुरवठा खंडित होईल. मात्र किती वीज वापरली, याची माहिती ग्राहकाला नियमितपणे भ्रमणध्वनीवर मिळेल. त्यामुळे भरलेल्या पैशांपैकी किती पैसे शिल्लक आहेत, आर्थिक नियोजनानुसार विजेचा वापर किती करायचा हे ग्राहकांना समजणार आहे. नव्या स्मार्ट मीटरसाठी ग्राहकांना कुठलीही रक्कम मोजावी लागणार नाही..

Leave A Reply

Your email address will not be published.